तालूक्यात आठ तासात ६५.५ टक्के पाऊस धनसळ येथे युवक ओढ्यात गेला वाहून
चार तासांपासून शोध कार्य सुरूच
राजु सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी । पुसद
तालुक्यात दि.२५ सप्टेंबर २०२३ रोजीच्या संध्याकाळी ५.३० वाजता सुरू झालेल्या पावसाने दाणादाण उडाली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सात ते आठ तासापासून पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. धुंवाधार पडलेल्या पावसामुळे अति सृष्टी निर्माण झाली आहे. तालुक्यातील धनसळ येथे राहणारा युवक दि.२६ सप्टेंबर २०२३ रोजीच्या सकाळी ११ वाजताच्या दरम्यान ओढ्यामध्ये पाणी पाहण्यासाठी गेला असता वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या चार तासापासून ओढ्यात वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्याचे कार्य प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
बाळू भीमराव पानपट्टे वय ४० वर्षे रा.धनसळ असे ओढ्यात गेलेल्या युवकाचे नाव आहे.तो गावालगत असलेल्या ओढ्यामध्ये पाणी पाहण्यासाठी गेला होता. परंतु त्याचा पाय घसरल्याने तो पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.तालुक्यातील आरेगाव,एरंडा,वरुड,कोपरा, भोजला,शेलू (खु.),निंबी,पार्डी, जाम बाजार,पिंपळगाव, वनवारला,रंभा,जमशेदपूर, गणेशपुर,लोणीसह आदी भागांमध्ये गेल्या सात ते आठ तासापासून धुवाधार पाऊस पडला आहे.परिसरामध्ये ६५.५ पाऊस पडल्याने ८० टक्के सोयाबीनचे पीक तर २० टक्के यामध्ये ऊस,कापूससह आदी पिके गुडघाभर पाण्याखाली आल्याने संकटात आले आहे. परिसरात अति सृष्टी सारखा पाऊस पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून जोर धरत आहे.