दिव्यांगांच्या समस्या थेट उपमुख्यमंत्र्यांच्या कक्षात राज्यस्तरीय विशेष मदत कक्षात गुरुदेव युवा संघाचा पाठपुरावा
यवतमाळ : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे जीवनमान उंच व्हावे त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात तसेच त्यांना त्यांच्या हक्काच्या योजना व वैद्यकीय मदत तातडीने मिळावी यासाठी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी थेट उपमुख्यमंत्री यांचे मुंबई येथील कार्यालय गाठले.आज १७ मे रोजी त्यांनी दिव्यांग मंडळाच्या अध्यक्षांना निवेदन सादर करून जिल्ह्यातील दिव्यांगांची वस्तुस्थिती लक्षात आणून दिली.
राज्य शासनाच्या दुर्बल व निराधार घटकातील गरजूंसाठी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष स्थापला आहे. उपमुख्यमंत्री यांच्या कक्षातून या संदर्भातले कामकाज चालते.या कार्यालयात गुरुदेव संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी भेट दिली त्या ठिकाणी असलेल्या दिव्यांग मंडळाचे अध्यक्षांना त्यांनी निवेदन सादर केले सोबतच उपमुख्यमंत्री कक्षातून चालणाऱ्या दिव्यांग तसेच निराधार बांधवांसाठी चालणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी,अशी अपेक्षा व्यक्त केली. यवतमाळ जिल्ह्यातील निराधार व दिव्यांग बांधवांसाठी लढणारी संघटना म्हणून गुरुदेव संघाचे नाव अल्पावधीतच लोकप्रिय झाले. दिव्यांगांचे जीवनमान उंचवावे ,यासाठी ते जिल्हा पातळीवर नेहमी प्रयत्नशील असतात.परंतु दिव्यांगांचे प्रश्न सुटत नसल्याने त्यांनी हे थेट उपमुख्यमंत्री कार्यालय गाठले या ठिकाणी त्यांनी आपल्या निवेदनातून दिव्यांग स्वावलंबन कर्ज वा अन्य तत्सम योजना योजनांची प्रभावी अंमलबाजवणी व्हावी,ग्रामपंचायीतमध्ये राखीव पाच टक्के निधीचा विनियोग व्हावा,जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांगांवर कार्यवाही करून त्यांना निलंबित केले जावे,शासकीय रुग्णालयात दिव्यांग सेवक नियुक्त केला जावा,दिव्यांग विवाहास दोन लाखांचे अनुदान दिले जावे,एसटी प्रवास मोफत केला जावा,जिल्हा पातळीपासून ते केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबाजवणी केली जावी,नगर परिषदेकडून दरमहा ५०० रुपयांचे अर्थसहाय्य दिले जावे,दिव्यांगांना सरसकट घरकुलाचा विनाशर्त लाभ दिला जावा,या मागण्यांकडे त्यांचे लक्ष वेधले.निवेदनावर गुरुदेव युवा संघाचे भाऊराव वासनिक,समाधान रंगारी, उमाकिसन आवारे, स्वाती कटारे प्रतिभा चौधरी गंगाधर शिरसाट अजय जाधव महेंद्र सावंतकर रामदास खोब्रागडे ,सय्यद अशपाक पृथ्वीराज जाधव रमेश मेश्राम इरफान अशोक, नेवलां आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बॉक्स
दिव्यांग बांधवांसाठी या बाबींकडे लक्ष देण्याची गरज
समाज कल्याण विभागाकडून दिव्यांगांसाठी विशेष तरतूद केली जाते मात्र त्यांना व्यवसायासाठी वीस हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत कर्ज पुरवठा होत नाही. बीज भांडवल योजनेतील अर्जदारांची कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत.नगर परिषदेकडून दरमहा मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्यासंदर्भातला प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला गेला परंतु,त्याची अंमलबजावणी झाली नाही. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत दिव्यांग बांधवांचा एएचपी घटकात समावेश केला जावा तसेच.ग्रामीण विकास यंत्रणेकडून ग्रामीण भागातील दिव्यांगांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नव्याने प्रयत्न केले जावे,अशी मागणी गेडाम यांनी आपल्या निवेदनातून केली.