खाजगी बसची ऑटोला बसची धडक दोन जवानांचा मृत्यू
कामठी/कन्हान / प्रतिनिधी
साहित्य खरेसी करून परतणाऱ्या जवानांच्या ऑटोला खाजगी बसने धडक दिल्याने ऑटोत बसलेल्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे.तर सहा जवान आणि ऑटो चालक असे सात लोक गंभीर जखमी आहेत. ही घटना जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान नदीच्या पुलावर रविवारी (ता.१६) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. विघ्नेश आणि धीरज रॉय (२४) रा. गिलोरा तामिळनाडू अशी मृतांची नावे आहेत.
कामठीतील सैनिक प्रशिक्षण केंद्रातील काही जवान साहित्य खरेदीसाठी कन्हानला गेले होते. खरेदीनंतर दोन ऑटोने परतताना एमएच-४९/एआर-७४३३ क्रमांकाचा ऑटो कन्हान नदीच्या पुलावर असताना शिवनीला (मध्यप्रदेश) जाणाऱ्या पवन ट्रॅव्हल्स क्रं. एमएच-३१/एफसी-४१५८ क्रमांकाच्या खासगी बसने धडक दिली.
यात ऑटोतील चालकासह सहा जवान गंभीर जखमी झाले. मागून ऑटोने येत असलेल्या सैनिकांनी सर्व जखमींना लगेच कामठी सैनिक प्रशिक्षण केंद्राच्या रुग्णालयात नेले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर पाच जवानांसह ऑटो चालकास नागपुरातील मेयोत हलविले तर तिघांना कामठीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघे नागपुरातील मेडिकल हॉस्पिटलच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याच माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी कामठी (जुनी) पोलिसांनी खासगी बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. बस चालक मधुकर विठ्ठलराव काळे, (वय ६०) याच्यावर जुनी कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातातील जखमींची नावे
कुमार पी., शेखर जाधव, मुरजम, अरविंद, नागारत्नम, बी. प्रधान अशी अपघातात जखमी झालेल्या जवानांची नावे आहेत. आटोचालक शंकर खरजबान रा.गोराबाजार हा गंभीर जखमी झाला आहे.
पुलावर वाहतूक खोळंबली
खासगी बसने धडक दिल्यानंतर ऑटोचा चेंदामेंदा झाला. ऑटोतील सर्व जवान बाहेर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाले. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. दरम्यान रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. तर पुलाजवळ अपघात झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. वाहतूक पोलिसांनी धाव घेऊन काही तासांत वाहतूक सुरळीत केली.