मदतीच्या बहाण्याने जखमी व्यक्तीची सोनसाखळी चोरणाऱ्या व्यक्तीवर पोलिस कारवाई

डोंबिवली / विशेष प्रतिनिधी
अपघातात किंवा इतर कारणाने अपघात झालेल्या व्यक्तीला वैद्यकीय सुविधा पुरविणे किंवा त्याला जवळच्या रुग्णालयात पोहचविणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. मात्र डोंबिवलीत या भावनेलाच काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका भीषण अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या बहाण्याने त्याच्याच गळ्यातील सोन्याची चैन चोरणाऱ्या नराधमाला विष्णूनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.सतीश कोरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय?
डोंबिवली पश्चिमेकडील गोपी चौक परिसरात राहणारे तुषार शिंदे हे एक वृद्धाश्रम चालवतात. काही दिवसांपूर्वी तुषार आपल्या दुचाकीवरून मानकोली-मोठा गाव ब्रिजवरून जात असताना त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात तुषार गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. त्यांना मदतीची नितांत गरज होती. असे असताना सतीश कोरे नावाचा तरुण पुढे आला. त्याने माणुसकी दाखवल्याचा आव आणत तुषार यांना रिक्षामध्ये बसवले. यानंतर तो उपचारासाठी डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या दिशेने निघाला.
तुषारला प्रचंड वेदना होत होत्या. याच वेळी रिक्षामध्ये असलेल्या आरोपी सतीश कोरेची नजर त्यांच्या गळ्यातील महागड्या सोन्याच्या चैनवर पडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याऐवजी सतीशच्या मनात लोभ निर्माण झाला. तुषार यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेत त्याने जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील चैन हिसकावून घेतली. धक्कादायक म्हणजे, यानंतर तुषार यांना तातडीने उपचार मिळवून देण्याऐवजी, सतीशने त्यांना शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातच सोडून दिले आणि तिथून पळ काढला.
विष्णूनगर पोलिसांची कारवाई
यानंतर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार मिळाल्यानंतर तुषार शिंदे यांनी आपल्यासोबत घडलेला हा संतापजनक प्रकार पोलिसांना सांगितला. या घटनेचे गांभीर्य ओळखून विष्णूनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रशांत मोरे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डोंबिवली पूर्वेकडील आजदे गावात सापळा रचून सतीश कोरेला अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेली सोन्याची चैन हस्तगत केली आहे. दरम्यान या नराधमाने मदत करण्याच्या नावाखाली इतर कोणाला लुटले आहे का, याचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.




