क्राइम

कागद चीनचा आणि नोटा भारतीय : बनावट नोटा छापणारे पोलिसांच्या ताब्यात 

Spread the love

पिंपरी  / नवप्रहार मीडिया

               अगदी कमी काळात श्रीमंत होण्याचे स्वप्न अनेक।लोकं पाहत असतात. त्यासाठी ते वाम मार्गाचा अवलंब करायला देखील मागेपुढे पाहत नाहीत. पिंपरी  पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या लोकांना पकडले आहे. चीन मधून ऑनलाईन कागद मागवून हे लोकं भारतीय मुद्राची छपाई करत होते. पुण्यातील अप्पा बळवंत चौकातून छपाईसाठी जुने ऑफसेट मशिन आणून दिघी येथील मॅगझिन चौकात बनावट नोटा छापण्याचा हा उद्योग सुरू करण्यात आला होता.

देहूरोड पोलिसांनी या ‘स्कॅम’चा पर्दाफाश केला. याप्रकरणी मास्टरमाइंडसह सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून ७० हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या. किवळे येथील मुकाई चौकात रविवारी (दि. २५) ही कारवाई केली.

ऋतिक चंद्रमणी खडसे (२२, रा. विठ्ठलवाडी, देहुगाव, मूळ रा. मंगरुळपीर, जि. वाशिम), सुरज श्रीराम यादव (४१, रा. चऱ्होली), आकाश विराज धंगेकर (२२, रा. आकुर्डी, मूळ रा. अंबेजाेगाइ, ता. जि. धाराशिव), सुयोग दिनकर साळुंखे (३३, रा. आकुर्डी, मूळ रा. दुधवंडी, ता. पलूस, जि. सांगली), तेजस सुकदेव बल्लाळ (१९, रा. अरणगाव, ता. भूम, जि. धाराशिव), प्रणव सुनील गव्हाणे (३०, रा. आळंदी रस्ता, भोसरी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी पोलिस अमंलदार किशोर परदेशी यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतिक खडसे हा माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील पदविका (डिप्लोमा) धारक आहे. तसेच सुरज यादव हा वाहन चालक आहे. छपाइचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ऋतिक, सुरज आणि त्यांचे इतर साथीदार एकत्र आले. त्यासाठी दिघी येथील मॅगझीन चौक परिसरात एक गाळा भाडेतत्त्वावर घेतला. पुण्यातील अप्पा बळवंत चौकातून छपाईचे एक जुने ऑफसेट मशिन आणले. त्यावर पत्रके तसेच इतर छपाईची कामे करण्याची त्यांनी तयारी केली. मात्र, त्यांना छपाईची कामे मिळाली नाहीत. त्यामुळे गाळ्याचे भाडे आणि इतर खर्च वाढला. त्यातून आर्थिक बोजा पडत असल्याने काही तरी वेगळे करण्याचे त्यांनी ठरवले.

”मला नोटांचे डिजाइन करता येते. चलनी नोटा छापल्यास आपल्याला मोठा फायदा होईल”, अशी कल्पना सुरज याला सुचली. त्यानुसार त्यांनी चीन येथून ऑनलाइनव्दारे तेजस बल्लाळ याच्या पत्त्यावर कागद मागवला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात ७० हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या चलनी नोटांची छपाई केली. या नोटा देण्यासाठी एका व्यक्तीशी संपर्क साधला. एक लाखाच्या बनावट नोटांच्या बदल्यात ४० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार ऋतिक हा ७० हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा घेऊन किवळे येथील मुकाई चौकात आला. याबाबत देहूरोड पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस आयुक्त देवीदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या पथकाने ऋतिक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बनावट नोटा जप्त केल्या. तसेच त्याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली.

शाई कोठून आणली?

पहिल्या टप्प्यात दोन लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा छापता येतील इतका कागद चीन येथून मागवण्यात आला. त्यातील ७० हजार रुपये किमतीच्या बनावट नोटांची छपाई केली. देहूरोड पोलिसांनी याप्रकरणात चलनातील बनावट नोटा, छपाई मशिनसह कागद असा एकूण पाच लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. बनावट नोटा छापण्यासाठी शाई कोठून आणली, याचाही शोध पोलिस घेत आहेत.

एकाच महिन्यात दुसरे रॅकेट गजाआड

हिंजवडी आयटी पार्क परिसरात घरातच भारतीय चलनातील नोटा छपाईचा प्रकार समोर आला होता. हिंजवडी पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी कारवाई करून बनावट नोटा जप्त केल्या होत्या. तसेच अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा दाखल केला. यात दोघांना अटक केली. त्यापाठोपाठ किवळे येथे बनावट नोटांप्रकरणी देहूरोड पोलिसांनी कारवाई केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एकाच महिन्यात बनावट नोटा छापणारे दुसरे रॅकेट गजाआड केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close