एक खून लपवण्यासाठी त्याच्या हातून गेला 76 लोकांचा बळी

दिल्ली / नवप्रहार वृत्तसेवा
दक्षिण आफ्रिकेतल्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 29 वर्षांच्या आरोपीने कबुली दिली, की आगीची घटना घडली त्या दिवशी त्याने एका व्यक्तीचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर त्याने त्या व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावली होती. त्याच इमारतीत राहणाऱ्या टांझानियन ड्रग डीलरच्या सांगण्यावरून त्याने हा गुन्हा केला होता
आरोपीची ओळख उघड न झाल्याने दक्षिण आफ्रिकेतल्या माध्यमांनी त्याला ‘मिस्टर एक्स’ असं नाव दिलं आहे. माध्यमांनी असं सांगितलं आहे, की जोहान्सबर्गमधल्या मार्शलटाउन जिल्ह्यातल्या एका जीर्ण पाच मजली इमारतीला त्याने आग लावली होती. या घटनेत किमान 12 मुलांसह अनेक जण ठार झाले होते, तर 80हून अधिक जण जखमी झाले आहेत.
आगीच्या या घटनेमुळे मोठा राजकीय गोंधळ माजला होता. कारण, ही इमारत जोहान्सबर्ग शहर प्रशासनाच्या मालकीची होती; पण बेकायदा जमीनदारांनी ती आपल्या ताब्यात घेतली होती. इमारतीतले अनेक रहिवासी बेकायदा स्थलांतरित झालेले होते, असाही संशय आहे.
आरोपीने आपल्या जबाबात कबूल केलं आहे, की ही इमारत गुन्हेगारी कृत्यांचं आश्रयस्थान होती. अनेक ड्रग डीलर्सचा तिथे वावर असे. इमारतीच्या तळघरात अनेक मृतदेह असल्याचा दावाही त्याने केला आहे.
आपत्कालीन सेवा अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागली त्या रात्री इमारतीतल्या बहुतेकशा फायर एक्झिट कुलूपबंद होत्या. साक्षीदार आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तिसऱ्या मजल्यापर्यंत राहणाऱ्या काही जणांनी आपला जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून उडी मारल्या होत्या.
पोलिसांनी सांगितलं, की या आरोपीवर 120 जणांच्या हत्येचा प्रयत्न आणि जाळपोळ केल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. लवकरच त्याला जोहान्सबर्गच्या न्यायालयात हजर केलं जाईल.