देशबंधूदास वाचनालयात व्याख्यानमालेचे आयोजन
“स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतंत्र भारतातही उपेक्षितच राहिले- प्रा.अजय देशपांडे.
वरुड ( प्रतिनिधी)
वरुड शहरातील देशबंधू दास वाचनालयामध्ये तीन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.या व्याख्यानमालेत *”स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक धगधगते यज्ञकुंड”* या विषयावर प्रसिद्ध साहित्यिक प्रा.अजय देशपांडे यांनी प्रथम पुष्प गुंफले. याप्रसंगी सेवानिवृत्त प्रा.अनिल जावळे अध्यक्षस्थानी होते तर वाचनालयाचे अध्यक्ष आप्पा साहेब चौधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना प्रा.अजय देशपांडे यांनी सावरकरांचा प्रखर राष्ट्रवाद, त्यांची जन्मठेपेतील यातना, इंग्रजांनी केलेला अनन्वित अत्याचार, बारा वर्षाच्या कारावासातील मुक्ती नंतर रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी केलेले अस्पृश्यता निवारणाचे सामाजिक कार्य, पतित पावन मंदिराची उभारणी यासारख्या सावरकरांच्या जीवनातील उल्लेखनीय घटना आपल्या व्याख्यानात विशद केल्यात.
ते पुढे म्हणाले की, भारत मातेला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आपल्या जीवनाची आहुती देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यानंतर सुद्धा उपेक्षितच राहिले.स्वतंत्र भारतातही त्यांच्या कार्याचा उचित सन्मान होऊ शकला नाही,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल साहित्यिक प्रा.अजय देशपांडे यांचा शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
वाचनालयाचे संचालक ज्येष्ठ नागरिक अनिलराव तालुकदार यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा.अनिल जावळे यांनी सावरकांच्या जीवन कार्यावर समर्पक शब्दात आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुंदर संचलन व उपस्थितांचे आभार ग्रंथपाल चंद्रकांत चांगदे यांनी मानले. “वंदे मातरम” या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.