सत्तेत येण्याचे भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले आहे – डॉ. नितीन राऊत
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
नागपूर / प्रतिनिधी
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरु आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. सध्याचे चित्र पाहता काँग्रेस बहुमताचा आकडा सहजपणे गाठेल, असा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सत्तेत येण्याचे भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले आहे. असे प्रतिपादन आज काँग्रेसचे जेष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीएसचा धुव्वा उडवत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विधानसभेच्या २२४ जागांपैकी तब्बल १३५ पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत काँग्रेसने कर्नाटकाची सत्ता काबीज केली आहे. सर्व जागांवरील अंतिम निकाल येणं अद्याप बाकी आहे. मात्र आता मतमोजणीच्या अनेक फेऱ्या पार पडल्या असल्याने यात फारसा फरक पडणार नसल्याचं स्पष्ट आहे.
भाजपच्या अमर्याद आणि बेफाम भ्रष्टाचाराने त्रस्त झालेल्या कर्नाटकातील जनतेने भाजपच्या कुशासन आणि अलोकतांत्रीक धोरणांना नाकारुन सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवला. हि निवडणूक काँग्रेस, व्देष व सूडबुद्धीच्या विरोधात नम्रता आणि प्रेमाने लढली आणि तेथील जनतेने व्देषाला व सुडबुध्दीला केराची टोपली दाखविली आणि सिध्द केले की त्यांना या देशात प्रेमाची गरज आहे. भारत जोडो यात्रा 21 दिवस कर्नाटकात होती. यावेळी राहुलजी लोकांना भेटले, त्यांना ऐकले, त्यांच्या भावना समजुन घेतल्या त्याचे उत्तर आज देश बघत आहे, अनुभवत आहे. काँग्रेस पक्षाने दलित समाजाच्या एका नेत्याला देशातील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष केले. ते श्री मल्लीकार्जुन खरगेजी यांचे कर्नाटक हे गृह राज्य आहे. यावेळी डॉ. राऊत यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला नेत्रदिपक, ऐतिहासीक विजय मिळवून दिल्याबद्दल तेथील नागरीक, काँग्रेस नेते व कार्यकर्ते यांचे मन:पुर्वक अभिनंदन करून आभार मानले.