बॉयफ्रेंड ने गर्लफ्रेंड ला चालत्या कार मधून फेकले

मुजफ्फरनगर / नवप्रहार मीडिया
मैत्री, लव्ह आणि धोका या गोष्टी सोशल मीडिया आल्यापासून फार वाढल्या आहेत. ऑनलाईन प्रेम झाल्याबरोबर हे लोक लगेच लग्नाचा विचार करतात . लागज नाही तर लिव्ह इन मध्ये राहायला सुरवात करतात. दरम्यान मुलाचे अन्य मुलीसोबत किंवा मुलीचे अन्य तरुणा सोबत जमले की मग दोघात बेबनाव होते .आणि त्याचा शेवट अत्यंत निर्दयी होतो .
फेसबुक वर मैत्री झालेल्या तरुण आणि तरुणीचा अत्यंत भयानक किस्सा समोर आला आहे. बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडला दिवसाढवळ्या चालत्या कारमधून फेकलं आणि तो फरार झाल्याची खळबळजनक घटना बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये झाली आहे.
तरुणीला कारमधून फेकल्यानंतर सरकारी बस स्टॅण्डवर खळबळ माजली. भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे तिथे उपस्थित असलेले नागरिकही भयभीत झाले. युवतीला गाडीतून खाली फेकल्यानंतर गाडीतली माणसं तिथून पसार झाली.गाडीतून फेकलेल्या मुलीला बेशुद्ध अवस्थेमध्येच मुजफ्फरपूरच्या रुग्णालयात दाखल केलं गेलं. शुद्धीमध्ये आल्यानंतर मुलीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
मुलीची सीतामढीमध्ये राहणाऱ्या दिव्यांकसोबत फेसबुकवर तीन वर्षांपूर्वी मैत्री झाली. आरोपीने पहिले तरुणीसोबत मैत्री वाढवली आणि मग तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि मग लग्नासाठी प्रपोज केलं. तरुणीनेही या लग्नासाठी तिच्या घरच्यांना तयार केलं आणि ती मुलाकडे पटणा स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या नावाखाली गेली.मागच्या तीन वर्षांपासून दोघं पटणामध्ये एकत्र राहत होते आणि स्पर्धा परिक्षेची तयारी करत होते. दिव्यांक आपल्याला धोका देत असून तो फेसबुकच्या माध्यमातून अनेक तरुणींच्या संपर्कात आहे, असं तिच्या लक्षात आलं आणि तिने याला विरोध करायला सुरूवात केली.
यानंतर दिव्यांकने तरुणीला रोजच मारहाण करायला सुरूवात केली. मारहाणीला विरोध केल्यानंतर दिव्यांकने वडील आजारी असल्याचं सांगून तरुणीला सीतामढीला जायला तयार केलं.सीतामढीला जाण्यासाठी दोघं पटण्याहून कारने निघाले आणि मुजफ्फरपूरच्या इमली चट्टी सरकारी बस स्टँडवर तरुणीला चालत्या गाडीतून फेकण्यात आलं. यानंतर स्थानिक लोकांनी तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. शुद्धीवर आल्यानंतर मुलीने तिच्या नातेवाईकांना फोन केला आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.