मुंबई पोलिसांनी गाठला सुतावरून स्वर्ग

बरोबर हेरले आणि केली कारवाई
मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क
मुंबई पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रताप करून दाखवला आहे. त्यांनी केवळ एका माहितीच्या आधारावर बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांना जगातील दुसऱ्या नंबर ची पोलीस यंत्रणा का म्हणतात हे दाखवून दिले आहे.
या कॉल सेंटरमधून जवळच्या एका विशिष्ट हॉटेलमधून पहाटे चार वाजता नाश्ता ऑर्डर केला जायचा. त्या आधारे पोलिसांनी माग घेतला. मुंबई शहराच्या बाहेर असलेल्या राजोरी बीच या ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली.
या कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांना संबंधित बिल्डिंग सोडून जाण्याची मनाई होती आणि बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधू दिला जायचा नाही. पण या सेंटरमधील कर्मचाऱ्यांसाठी रोज पहाटे चार वाजता जवळच्या एका विशिष्ट हॉटेलमध्ये नाश्त्याची ऑर्डर दिली जायची.
पोलिसांना माहिती मिळाली की, या सेंटरमधून कोणीतरी जवळच्या हॉटेलमध्ये रोज मोठ्या प्रमाणात नाश्ता ऑर्डर करत आहे, तेही पहाटे 4 वाजता. या बीचच्या ठिकाणी वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी असते, पण इतर वेळी मात्र हे ठिकाण निर्जन असतं. त्यामुळे या ठिकाणी काहीतरी अवैध गोष्ट सुरू असल्याचा पोलिसांना संशय आला आणि त्यांनी त्या जागेवर लक्ष ठेवणे सुरू केले.
अनेक दिवसांपासून दररोज पहाटे देण्यात येत असलेल्या 50 ते 60 चहा-नाश्त्याच्या ऑर्डरमुळे पोलिसांचा संशय वाढला आणि पोलिसांनी त्या जागेवर गुप्तपणे लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. नंतर पोलिसांनी या सेंटरवर छापा टाकून मालकासह 47 कर्मचाऱ्यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणूक, तोतयागिरी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केंद्रातील जप्त केलेल्या संगणकांचीही फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचार्यांना ऑस्ट्रेलियातील संशयित बँक ग्राहकांचे कॉल रिसिव्ह करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या ठिकाणी पोलिसांना अनेकांची संवेदनशील वैयक्तिक तपशील आणि वन-टाइम पासवर्डसह सुरक्षा माहिती मिळाली. पोलिसांना मिळालेली माहिती ही हिमनगाचे टोक असू शकते. या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता असून पोलिस त्याचा तपास करत आहेत.
मुंबईत अशा प्रकारचे अनेक बनावट कॉल सेंटर सुरु असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. अशा प्रकारे कुठे अवैध गोष्टी सुरू असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.