मतदान वाढविण्यासाठी उमेदवारांनी देखील प्रयत्न करावे* – एम.मल्लिकार्जुन
उमेदवार व प्रतिनिधींसोबत बैठक
यवतमाळ वार्ता
अरविंद वानखेडे
या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाच्यावतीने प्रयत्न केले जात आहे. यवतमाळ वाशिम मतदारसंघात किमान ७५ टक्के मतदान व्हावे, यासाठी जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने जनजागृती करण्यात आली आहे. टक्केवारी वाढविण्यासाठी उमेदवारांनी देखील प्रयत्न करावे, असे आवाहन निवडणूक निरिक्षक एम.मल्लिकार्जुन नायक यांनी केले.
निरिक्षकांनी महसूल भवन येथे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्यासह उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते.
गेल्या निवडणुकीत मतदान कमी झालेल्या गावांमध्येही उमेदवारांनी आपल्या प्रतिनिधीद्वारे जनजागृती करुन मतदान वाढतील यासाठी सहकार्य करावे. राज्यात ६० ते ६२ टक्के मतदान होते. छत्तीसगड सारख्या राज्यात हे प्रमाण ७७ ते ७८ टक्के असे आहे. मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातील. मतदानासाठी मतदारांना उन्हात उभे रहावे लागू नये यासाठी केंद्राच्या ठिकाणी शेड उभारण्यात येणार असल्याचे निरिक्षक श्री.नायक म्हणाले.
गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांनी आपल्या गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावी. विना परवानगी उमेदवारांनी सभा, रँली, बैठका आयोजित करु नये. आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्रावर वेब कास्टींग केली जात आहे. ही प्रक्रिया देखील उमेदवारांनी समजून घ्यावी. इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन तयार करण्याचे काम सुरु आहे, याला देखील उमेदवारांनी भेट द्यावी. ही निवडणूक उत्तमपणे पार पाडण्यासाठी उमेदवारांनी सहकार्य करावे, असे निवडणूक निरिक्षक म्हणाले.