मुलीसोबत वाद पित्याने कुऱ्हाडीचे घाव घालत केले जीवनातून बाद

पुणे / नवप्रहार मीडिया
स्वत:च्याच १५ वर्षाच्या मुलीच्या डोक्यात कुर्हाडीने वार करुन तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कुटुंबात नवरा- बायको, भाऊ- बहीण, वडील आणि मुलगा अथवा मुलगी यांच्यात वाद हा काही नवीन विषय नाही. पण हा वाद विकोपाला गेला की मग प्रकरण कुठे जाईल याचा नेम।नसतो.अशीच घटना लोणीकंद ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. येथे एका पित्याने मुलीसोबत झालेल्या वादात तिच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालत तिचा खून केला आहे. सदर घटना अकरा वाजण्याच्या सुमारास वाघोली येथे घडली.
अक्षदा फकीरा दुपारगुडे (वय १५, रा. वाघोली) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. अक्षदा ही १० वीला शिकत होती. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले़ तोपर्यंत फकीरा दुपारगुडे हा पळून गेला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारगुडे हे कुटुंब मुळचे सोलापूरचे राहणारे आहे. फकिरा हा सेंटरिंगचे काम करतो. त्याची पत्नी धुणेभांड्यांची कामे करते. आज सकाळी धुणे भांड्यांची कामे करण्यासाठी त्याची पत्नी घराबाहेर गेली. घरात अक्षदा व फकीरा हे होते. कोणत्या तरी कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी फकिरा याने अक्षदाच्या डोक्यात, हातावर, पायावर कुर्हाडीने वार करुन तिला जखमी केले. तिचा आवाज ऐकून बाजूचे लोक धावत आले. त्यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. मार्शल घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमी अवस्थेत अक्षदाला ससून रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यु झाला.
फकिरा याने मुलीची हत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलीस फकिरा याचा शोध घेत आहे. वाघोली येथून तो पुण्याकडे येत असल्याचे त्याच्या लोकेशनवरुन पोलिसांच्या लक्षात आले.त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.