मदर्स डे च्या दिवशी घडला हा किळसवाणा प्रकार

इंदापूर / नवप्रहार न्यूज नेटवर्क
एकीकडे जगात ‘ मदर्स डे ‘ (मातृत्वदिन ) साजरा केला जात होता तर दुसरीकडे शहरात गर्भपाताचा प्रकार घडला आहे.पुरंदर तालुक्यातील इंदा गावात हा लाजीरवाना प्रकार घडला आहे. डॉक्टर, संबंधित महिला आणि मध्यस्थाला अटक केली आहे. ‘मदर्स डे’च्या दिवशी हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ संग्रामआप्पा यम्पल्ले यांनी जेजुरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला राज्याच्या कुटुंब कल्याण कार्यालयाकडून गोपनीय ईमेल आला होता. हा ई-मेल 12 मे रोजी आला होता. त्यामध्ये पुरंदर तालुक्यातील पिसुर्डी या गावांमध्ये बरकडे नावाचा एजंट असून तो निरा गावातील डॉक्टर सचिन रणवरे यांच्या श्रीराम हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात करत असल्याची माहिती दिली होती, असं समोर आलं होतं. दरम्यान 14 मे रोजी डॉक्टर सचिन रणवरे हा डॉक्टर दिपाली थोपटे नावाच्या गर्भवती महिलेचा गर्भपात करणार असल्याची माहिती देखील या ई-मेलवर आली होती. या महिलेला पहिली मुलगी असून बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान केल्यानंतर नीरा येथील बारामती रस्त्यावरील श्रीराम हॉस्पिटलमध्ये डॉ. रणवरे हा तिचा गर्भपात करणार असल्याची माहिती मिळाली होती.
हा सगळा प्रकार कळल्यानंतर डॉक्टर यम्पल्ले हे विधी सल्लागार अॅड. मेघा सतीश सोनतळे यांच्यासह श्रीराम हॉस्पिटलमध्ये आज रविवारी पोहोचले. या ठिकाणी दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर सचिन रणवरे यांचे वडील राम रणवरेदेखील या ठिकाणी होते. त्यांना डॉ. यम्पल्ले यांनी आपली ओळख सांगितली आणि त्यानंतर दवाखान्याची तपासणी केली.
फोन केला अन् सत्य उघड झालं…
दवाखान्याच्या गर्भपात केंद्र व सोनोग्राफी केंद्राची तपासणी केली. मात्र त्यावेळी रजिस्टरमध्ये दिपाली थोपटे हे नाव नव्हते. त्यानंतर दिपाली यांना फोन केला असता त्यांच्या नातेवाईकांनी शनिवारी संध्याकाळीच गर्भपात केला असल्याची माहिती दिली. हा गर्भपात डॉ. सचिन रणवरे याने केला असून त्यासाठी बरकडे नावाच्या एजंटने गर्भलिंगनिदान केले असल्याची माहिती देखील मिळाली. त्यानंतर डॉक्टर एमपल्ले यांनी पुन्हा डॉक्टर सचिन रणवरे यांच्याकडे चौकशी केली, तेव्हा सचिन रणवरे यांनी दिपाली थोपटे यांचे अर्धवट भरलेले अर्ज आणि इतर माहिती डॉक्टर यांच्याकडे दिली. त्यातून या ठिकाणी बेकायदेशी रित्या गर्भपात झाल्याचं निष्पन्न झालं.