पत्रात ‘ लव्ह यू एनआयटी ‘ लिहून ती झाली बेपत्ता
इंदूर / नवप्रहार डेस्क
१५ सप्टेंबर रोजी चार पानाच्या पत्रात ‘ लव्ह यू एनआयटी ‘ असे शेवटचे शब्द लिहून बेपत्ता झालेल्या ओजस्वी चा अद्याप पता लागलेला नाही. पोलीस तिचा शोध घेत आहेत. वडील देखील आपल्या परीने तिला शोधत आहेत. पण अद्याप तिची काहीच माहिती नाही. तीच्या पत्रात अनेक शाशंक बाबीचा उल्लेख असल्याचे बोलल्या जात आहे.
ओजस्वीने जेईई परीक्षेत देशात ७२ वा क्रमांक मिळवला होता. ओजस्वी ही मूळची इंदूर, मध्य प्रदेशची असून ती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्रिचीमधून पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तामिळनाडू पोलीस ओजस्वीचा शोध घेत आहेत. इंदूरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांनी सीएम मोहन यादव यांना निवेदन देऊन ओजस्वीचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
इंदूरमधील एका कॉलेजमधून ओजस्वीने इंजिनीअरिंग केले आणि नंतर एका आयटी कंपनीत काम करायला सुरुवात केली. पण तिचे स्वप्न एनआयटीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असे होते. नोकरीसोबतच ओजस्वीने जेईईची तयारी सुरू केली. जेईई परीक्षेत ओजस्वीने देशात ७२ वा क्रमांक पटकावला. त्यानंतर तिला एनआयटी त्रिचीमध्ये प्रवेश मिळाला. ओजस्वीने ऑगस्टमध्ये एमसीएचा अभ्यास सुरू करण्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
ओजस्वी अभ्यासात हुशार होती, हे तिने एनआयटीमध्ये जाताच सिद्ध केले. त्यामुळे तिला वर्ग प्रतिनिधी बनवण्यात आले. मात्र, ओजस्वीला वर्ग प्रतिनिधी करण्यात आल्याने काही लोक खूश नसल्याचे बोलले जात आहे. खुद्द ओजस्वी हिनेही आपल्या चिठ्ठीत याचा उल्लेख केला आहे. १५ सप्टेंबर रोजी ती कॉलेज कॅम्पसमधून बाहेर पडताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये शेवटची दिसली होती.
मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी मिळाल्यानंतर ओजस्वीचे वडील नरेश गुप्ता त्रिचीमध्ये आहेत. पोलिसांसह ते आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांनी सांगितले की, ते रोज सकाळ संध्याकाळ आपल्या मुलीशी बोलत असत. १४ सप्टेंबरच्या रात्री शेवटचे बोलणे झाले. परंतु तिने कोणतीही अडचण सांगितली नाही. १५ सप्टेंबरला आम्ही आमच्या मुलीला फोन केला तेव्हा तिने कॉल रिसिव्ह केला नाही. त्यामुळे आम्हाला वाटले की क्लास मिस झाला असावा. पण, रात्री मला एनआयटी मधून तुमची मुलगी हरवल्याचा फोन आला. यानंतर पोलीस ठाण्यात ओजस्वी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रात्री काय झालं?
ओजस्वीसोबत वसतिगृहात राहणाऱ्या मुली सांगतात की ती रात्री तीन वाजेपर्यंत आमच्यासोबत अभ्यास करत होती. सकाळी सातच्या सुमारास आम्हाला जाग आली तेव्हा ती खोलीत नव्हती. ती कुठेतरी बाहेर गेली असावी, असे आम्हाला वाटले, पण सकाळी आठपर्यंत ती परतलीच नाही. बराच वेळ तिची वाट पाहत राहिलो, दरम्यान आम्ही तिच्या खोलीत ठेवलेली बॅग तपासली तेव्हा आम्हाला चार पानी चिठ्ठी सापडली. यामध्ये तिने सीआर (वर्ग प्रतिनिधी) झाल्यानंतर मानसिक तणावाखाली राहणे, छळ होणे अशा अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.