मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश विकास कामांच्या दर्जात कोणतीही तडजोड नको
मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांचे अधिकारयांना निर्देश
विकास कामांच्या दर्जात कोणतीही तडजोड नको
नागपूर: प्रकल्पांच्या तसेच विकास कामांच्या दर्जाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी यांनी आज रवि भवन सभागृहात झालेल्या बैठकीत अधिकारयांना दिले.
नागपूर शहर व जिल्ह्यातील विविध प्रकल्प, योजना तसेच विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मा. ना. श्री. गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, प्रवीण दटके, मोहन मते यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महापालिका आयुक्त बी. राधाकृष्णन, नासुप्रचे सभापती डॉ. मनोज सूर्यवंशी व इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
रेशीमबाग मैदानाचा विकास, स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत वाकी, धापेवाडा, पारडसिंगा व गिरड तीर्थक्षेत्राचा विकास, मौदा मार्गावरील परमात्मा एक सेवक प्रकल्प, पश्चिम व उत्तर नागपुरातील रस्त्यांची कामे, पुनापूर- भरतवाडा येथील विटा भट्टीच्या जमिनीचा प्रश्न, चौक व उद्यानांचे सौंदर्यीकरण इत्यादी अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
विकास योजनांसाठी वापरला जाणारा पैसा हा जनतेचा आहे. आपण त्याच्या योग्य वापराची काळजी घेणे अपेक्षित आहे. कारण आपण त्या निधीचे विश्वस्त आहोत, असे सांगून मा. ना. श्री. गडकरी म्हणाले की, अधिकारयांनी कुणाचाही मुलाहिजा न करता कामाच्या दर्जाबद्दल काटेकोर राहिले पाहिजे. त्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारता कामा नये. गरज पडल्यास अधिकारयांनी कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करावी आणि दर्जेदार नसलेली कामे जमीनदोस्त करून पुन्हा बांधायला लावावीत.
कामाचा दर्जा उत्तम राखणे, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होणे आणि त्यासाठी सतत पाठपुरावा करणे ही अधिकारयांची जबाबदारी आहे. कामांमध्ये हयगय हलगर्जीपणा झाल्यास कंत्राटदारांसोबत अधिकारयांना देखील जबाबदार धरले जाईल व त्यांच्या कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही मा. ना. श्री. गडकरी यांनी दिला.
हलबा समाजाच्या कर्मचाऱ्यांना जात प्रमाणपत्राचे व्हेरिफिकेशन करण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणीवर लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत मा. श्री. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.