वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

गडचिरोली, / तिलोत्तमा हाजरा
शेतात धान कापत असताना वाघाने हल्ला करून एका महिलेला ठार केले. ही घटना गुरुवार (ता. १९) दुपारी १२. ३० वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील रामाळा गावाजवळ घडली. ताराबाई एकनाथ धोडरे(वय ६०)रा. काळागोटा, ता. आरमोरी, जि. गडचिरोली, असे मृत महिलेचे नाव आहे.
सध्या धान कापणीच्या कामाला वेग आला असून ताराबाई धोडरे ही गुरुवारी अन्य सहा मजूर महिलांसह आरमोरीपासून अवघ्या पाच किमी अंतरावरच्या रामाळा येथील अमोल धोडरे यांच्या शेतात धान कापणीसाठी गेली होती. धान कापत असताना अचानक वाघाने तिच्यावर हल्ला केला. यात ती जागीच ठार झाली. यावेळी सोबत असलेल्या महिला पळून गेल्याने त्यांचा जीव वाचला. ही माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी अविनाश मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत महिलेच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
——————-