विदेश

कामासाठी इराण ला गेला अन तुरुंगात अडकला 

Spread the love

हिंगोली / नवप्रहार ब्युरो .

                    हिंगोली येथील एक तरुण इराण ला व्यवसायाच्या निमित्ताने गेला. पण त्याला तेथे तुरुंगाची हवा खावी लागली. मागील दोन महिन्यांपासून तो तुरुंगात आहे. इकडे कुटुंबातील लोकांना त्याची चिंता सतावत होती. पण काल पतीने पत्नीला व्हिडीओ कॉल केल्याने ही बाब उघड झाली. चला तर पाहूया त्या तरुणाने असे काय केले की इराण पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकले.

आता अखेर दोन महिन्यानंतर संबंधित तरुणाशी संपर्क झाला आहे. एका गुन्ह्यात तो इराणच्या तेहरान तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित तरुणाने तुरुंगातून व्हॉट्सअॅप कॉलद्वारे आपल्या पत्नीशी संपर्क साधला. त्यानंतर तो तेहरानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचं समोर आलं आहे.

योगेश पांचाळ असं इराणमध्ये अटक झालेल्या हिंगोलीच्या तरुणाचं नाव आहे. तो पेशानं इंजिनिअर असून त्याचा इम्पोर्ट- एक्स्पोर्टचा व्यवसाय आहे. तो ड्राय फ्रुट्स, सफरचंद आणि एअर कूलर सारख्या वस्तू आयात निर्यात करतो. मागील वर्षी 5 डिसेंबरला तो एका कामानिमित्त टुरिस्ट विझावर इराणला गेला होता. इराणला गेल्यानंतर दोनच दिवसात म्हणजेच 7 डिसेंबरपासून तो बेपत्ता झाला. कुटुंबीयांशी त्याचा कसलाही संपर्क होऊ शकला नाही.

आता अखेर गुरुवारी 30 जानेवारीला त्याचा कुटुंबीयांशी संपर्क झाला आहे. पुढच्या मंगळवारी तुरुंगातून सुटका होईल, त्यानंतर मी भारतात परतेन, असं त्याने आपल्या पत्नीला सांगितलं आहे. दोघांमध्ये जवळपास दीड मिनिटं संभाषण झालं आहे. या फोन कॉलमुळे पांचाळ कुटुंबीयांच्या जीवात जीव आला आहे. मागच्या दोन महिन्यांपासून योगेशचा कुटुंबीयांशी कसलाच संपर्क नसल्याने कुटुंबीय हवालदिल झाले होते.

योगेशसोबत नेमकं काय घडलं?

खरंतर, इराणमध्ये गेल्यानंतर योगेशने काही संवेदनशील फोटोज क्लीक केले होते. त्याने मनोरंजन म्हणून हे फोटो क्लीक केले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर योगेशविरोधात इराणमध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्याची रवानगी तेहरान तुरुंगात झाली होती. पण त्याने संबंधित फोटो पत्नीव्यतिरिक्त इतर कोणालाही पाठवले नव्हते. याबाबतचे योगेशचे व्हॉट्सअॅप डिटेल्स कोर्टासमोर सादर केल्यानंतर योगेशच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. इराणमधील भारतीय दुतावासाच्या मदतीने योगेशची सुटका होणार आहे. मंगळवारी त्यांची तेहरानच्या तुरुंगातून सुटका होऊ शकते. यानंतर त्याला भारतात पाठवलं जाऊ शकतं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close