क्राइम
दोन मुलांच्या आईवर प्रेम आणि भयानक शेवट

नांदेड / विशेष प्रतिनिधी
२२ वर्षीय तरुणाला नात्यातील एका महिलेशी प्रेम सबंध ठेवणे महागात पडले आहे. दोन मुलांची आई असलेल्या महिलेच्या पतीला आणि इतर लोकांना जेव्हा या संबंधाबद्दल कळले तेव्हा कुटुंबातील लोकांचा पारा चढला आणि त्याच्या खात्म्याच्या प्लान तयार झाला. विशेष म्हणजे खून झालेला तरुण हा महिलेचा नातेवाईक होता.
घटना नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात घडली आहे. थडी सावळी येथे ३ मार्च रोजी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या सात नातेवाईकांना अटक केली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गेश्वर ठाकूर असं हत्या झालेल्या २२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो बिलोली तालुक्यातील मुतन्याळ येथील रहिवासी होता. तो व्यवसायाने इलेक्ट्रिशियन होता. त्याचं त्याच्याच नात्यातील एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. संबंधित महिलेला दोन मुलंही आहेत. मात्र, या प्रेमसंबंधांची कुणकुण महिलेचा पती आणि इतर नातेवाईकांना लागली होती. याच रागातून दुर्गेश्वरचा काटा काढण्याचं नियोजन संशयितांनी केलं.
advertisement
घरातून बोलावून घेतले आणि घात केला
३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास संशयितांनी दुर्गेश्वरला त्याच्या घरातून थडी सावळी येथे बोलावून घेतलं. तो तिथे पोहोचताच आधीच तयारीत असलेल्या नातेवाईकांनी त्याच्यावर हल्ला चढवला. संशयितांनी केबल वायरने दुर्गेश्वरच्या पाठीवर, छातीवर आणि पायावर सपासप वार केले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी दुर्गेश्वरच्या गुप्तांगावर जोरात लाथा मारल्या. यामुळे त्याला वेदना असह्य होऊन उलट्या झाल्या आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
advertisement
सात आरोपींना अटक
या प्रकरणी मृताचे वडील रवींद्रसिंह ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात संशयितांना अटक केली. पद्मसिंह ठाकूर, राजूसिंह ठाकूर, गंगासिंह ठाकूर, दिलीपसिंह ठाकूर, विजयसिंह ठाकूर, विशालसिंह ठाकूर आणि प्रतापसिंह ठाकूर असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. सर्वांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. घटनेचा पुढील तपास रामतीर्थ पोलीस करत आहेत.




