राजकिय

जालन्याच्या घटनेवर ऊर बडवून घेणाऱ्यांचे अश्रू म्हणजे  मगराश्रु – शिंदे 

Spread the love

बुलढाणा / नवप्रहार मीडिया

                  जे शनिवारी जालन्यात मराठा आरक्षणाला घेऊन सुरू असलेल्या आंदोलकांवर झालेल्या ‘लाठीचार्ज ‘ चा निषेध करून ऊर बडवून घेत होते त्यांनीच आरक्षणाचा गळा घोटला.  दीर्घकाळ सत्तेत असणारे असो की मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण असोत की अडीच वर्षे मुख्यमंत्री राहणारे उद्धव ठाकरे असोत. त्यांचे अश्रू हे मगराश्रु असल्याचा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज मलकापूर मार्गावरील कऱ्हाडे लेआऊटमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री वगळता मंत्री, खासदार, आमदार बहुसंख्येने हजर होते. ”राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध आहे. ४० वर्षे सत्तेत असणाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात मराठा आरक्षणावर एक शब्दही काढला नाही. आज ऊर बडवणाऱ्यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आरक्षणविषयक प्रशासकीय व अनुषंगिक घोळ घातला. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात उच्च न्यायालयापर्यंत टिकलेले आरक्षण रद्द झाले. सर्वोच्च न्यायालयात यासाठी अभ्यासू सॉलिसिटर, विधिज्ञ नेमण्यात आले नाही,” असा आरोप मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून विरोधक माझा पराकोटीचा द्वेष, मत्सर करतात. मात्र, एक वर्ष उलटूनही माझे पद कायम आहे. याउलट आता अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने पद अन सरकार अधिकच बळकट झाल्याचा टोला त्यांनी लगावला. मंत्री गिरीश महाजन यांनी, चाळीस वर्षांत मराठा आरक्षणावर एक शब्द न बोलणाऱ्या शरद पवार यांची जालना भेटीत ‘ऐतिहासिक नाचक्की’ झाल्याचे यावेळी वक्तव्य केले.

मुख्यमंत्र्यांच्या रविवारच्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार दोघेही उपस्थित नव्हते. यामुळे अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान दोन्ही उपमुख्यमंत्री हजर नसल्याचे कृपया राजकारण करू नका, असे विरोधक व प्रसारमाध्यमांना उद्देशून म्हटले.

मुख्यमंत्र्यांनी भाषणात शेतकरी व दुष्काळग्रस्त परिस्थिती यावर काहीच भाष्य केले नाही. यामुळे एका शेतकऱ्याने जागेवरून उठून ‘दुष्काळाबद्दल सांगा’ असे ओरडून सांगितले. तेथे तैनात पोलिसांनी तत्काळ त्याच्याभोवती कडे घालत सभास्थळाबाहेर नेले.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close