30 एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालत
नागपूर जिल्ह्यातील तीस हजार प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे
तडजोडीसाठी ठेवली जाणार”
नागपूर,दि. 21 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूरच्या वतीने रविवार, 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधितानी या सुवर्ण संधीचा लाभ राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून घ्यावा. जास्तीत जास्त प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवून त्यांचा निपटारा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकअदालती मागचा मुख्य उद्देश मोठया प्रमाणावर प्रलंबित असलेली प्रकरणे, तसेच नवीन प्रकरणे किंवा महत्वाची प्रकरणे लोक न्यायालय सारख्या यंत्रणेच्या माध्यमातून त्वरीत निकाली व मोठया प्रमाणावर निवारण करणे आणि मोठया प्रमाणावरील प्रलंबित प्रकरणामधून योग्य प्रकरणांची छाननी करुन आपसी समझोत्याकरीता प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीकरीता ठेवणे हा आहे.
30 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात उच्च न्यायालय व त्यांची सर्व खंडपीठ, जिल्हा न्यायालय, सर्व न्यायाधीकरण आणि तालुका न्यायालयाच्या ठिकाणी एकाच वेळी राष्ट्रीय लोक अदालत भरविण्यात येणार आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे विविध स्थानी आपसी समझोत्यासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये समझोता योग्य फौजदारी प्रकरणे पराक्राम्य दस्ताऐवज अधिनियमाच्या कलम 138 ची प्रकरणे अधिकोष वसुली प्रकरणे मोटार अपघात दावा प्राधिकरणातील प्रकरणे, अपघात माहिती अहवाल, राज्य परिवहनाची प्रकरणे, वैवाहिक व कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणे श्रमिकांचे वाद व त्यांच्या पुर्ननियुक्तीमधील जुन्या वेतनासंबंधीची प्रकरणे (कामगारांसंबंधी निस्तारणासंबंधीचे दावे, पॉलिसी, औद्योगिक कामगारांच्या वेतनासंबंधीचे आणि इतर प्रलंबित फायदयांची प्रकरणे) भू-संपादन प्रकरणे, विजेची आणि पाणी बिलाची (सोबत चोरीची) प्रकरणे नोकरी संबंधी प्रकरणे – ज्यामधील पैसे आणि भत्ते आणि सेवानिवृत्तीनंतरच्या फायदयासंबंधित प्रकरणे, महसूल प्रकरणे, दिवाणी दावे जसे भाडेसंबंधी, वहीवाटसंबंधीचे दावे, ग्राहक तक्रारी संबंधित प्रकरणे.
लोक अदालतीमध्ये नागपूर जिल्ह्यातील एकूण 30 हजार प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर द्वारा आयोजित लोकअदालतीमध्ये पूर्वबोलणी आणि समोपचाराने पक्षकारांमधील वाद खेळीमेळीच्या माध्यमातून निकाली काढण्यात येणार आहे. लोकअदालतीच्या दिवशी प्रकरणातील वादात आपसी समझोता घडून आणण्याकरीता त्या समस्येची आगाऊ सूचना संबंधितांना देवून विचारविनिमय व चर्चेच्या माध्यमातून वादग्रस्त समस्या प्रभावीपणे आपसी समझोत्याद्वारे निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. लोकअदालतीमध्ये पक्षकारांचे मोठया प्रमाणावरील प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली काढण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर भरीव जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
संबंधित पक्षकारांनी अधिक माहितीसाठी रूम नं. 308, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय विस्तारीत इमारत, सिव्हिल लाईन्स, नागपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदिप गो. पांडे यांनी यांनी केले आहे.