अरे बाबो.. लाचखोर दुय्यम निबंधकाच्या घरात सापडली 1 कोटी 35 लाखांची कॅश

छत्रपती संभाजीनगर / नवप्रहार मीडिया
म्हणतात न की मनुष्याला कुठल्याही गोष्टीचे लालच फार महागात पडते. याचा प्रत्यय सिल्लोड येथील एका प्रकरणात आला आहे. एसीबीने एका शेतकऱ्याच्या तक्रारी वरून लाचखोर दुय्यम निबंधकाला लाच घेतांना रंगेहाथ अटक केली. आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या घरातून 1 कोटी 35 लाखांची नगदी रोकड सापडली आहे. छगन उत्तमराव पाटील (वय 49 वर्ष, रा. छत्रपती संभाजीनगर) असे या अधिकाऱ्याचे नाव असून, तो सिल्लोड येथील नोंदणी कार्यालयात कार्यरत होता. योगायोग म्हणजे बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणात या दुय्यम निबंधकाच्या निलंबनाचे आदेश सकाळी सिल्लोड कार्यालयात धडकले, त्याची अंमलबजावणी होण्यापर्वीच लाच घेतांना त्याला रंगेहात पकडण्यात आले.
अधिक माहितीनुसार, सिल्लोडच्या नोंदणी कार्यालयात दुय्यम निबंधक म्हणून छगन उत्तमराव पाटील कार्यरत आहेत. दरम्यान, सिल्लोड तालुक्यातील आमठाना येथील तक्रारदार व त्यांची भावजयी यांची धावडा शिवारातील गट क्रमांक 47/1 मध्ये सामाईक शेती आहे. या शेतीचा दस्त तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र दुय्यम निबंधक छगन पाटील याने 5 हजारांची मागणी केली. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे एसीबीच्या पथकाने 1 मार्च रोजी दुपारी दुय्यम निबंधक कार्यालयातच सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून 5 हजार रुपयाची लाच घेण्यात आली. या प्रकरणी छगन पाटील आणि स्टॅम्प वेंडर भीमराव किसन खरात या दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
घरात तब्बल 1 कोटी 35 लाखांची कॅश….
सिल्लोडच्या नोंदणी कार्यालयात दुय्यम निबंधक म्हणून कार्यरत असलेल्या छगन पाटील याला लाच घेतांना पकडण्यात आल्यावर, एसीबीच्या पथकाने तात्काळ त्याच्या घरावर छापेमारी केली. यावेळी कारवाईसाठी गेलेल्या पथकाला देखील धक्का बसला. कारण पाटील यांच्या घरात तब्बल 1 कोटी 35 लाखांची कॅश पथकाला मिळून आली आहे. पथकाने याबाबतचा पंचनामा केला असून, छगन पाटील यांना देखील अटक करण्यात आली आहे.
लाच लुचपत विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, “सापळा कारवाईनंतर तात्काळ आरोपी लोकसेवक छगन उत्तमराव पाटील यांच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील हिमायतबाग परिसरातील प्लॉट नं. 30 येथे राहत्या घराची झडती घेतली असता घरझडती दरम्यान खालील प्रमाणे स्थावर व जंगम मालमत्ता मिळून आली आहे.
- रोख रक्कम रुपये 1,36,77,400 रुपये (एक कोटी, छत्तीस लाख, सत्त्यात्तर हजार, चारशे रुपये)
- सोने 28 तोळे, अंदाजे किमंत 14,18,925 रुपये (चौदा लक्ष, अठरा हजार, नऊशे पंचवीस रुपये)
- विविध ठिकाणी स्थावर मालमत्ताबाबत कागदपत्रे.
- विविध बँकामध्ये मुदत ठेवी.
- एक चारचाकी वाहन, एक दुचाकी स्पोर्टस मोटारसायकल.
सकाळी निलंबनाचे आदेश, दुपारी लाच घेतांना अटक
सिल्लोड नोंदणी कार्यालयाची नोंदणी विभागाने अंतर्गत तपासणी केली. त्यावेळी 7 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या काळात तुकडेबंदी कायद्याचे उलंघन करून तब्बल 44 दस्तांची नोंदणी करण्यात आल्याचे समोर आले. यातील 42 दस्तांमध्ये मुल्यांकन कमी करून दस्तांची नोंदणी करीत 48 लाख 6 हजार 273 रुपयांचा शासनाचा महसूल बुडाल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारे एकूण 86 दस्तांमध्ये नोंदणी नियमांचा भंग केल्याचा ठपका चौकशी पथकाने पाटील याच्यावर ठेवला आहे. या चौकशी अहवालावरून 29 फेब्रुवारी 2024 रोजी पाटील यांना निलंबीत करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निलंबनाचे आदेश सकाळी सिल्लोड कार्यालयात धडकले, त्याची अंमलबजावणी होण्यापर्वीच लाच घेतांना पाटील याला रंगेहात पकडण्यात आले आहे.