राजकिय

काँग्रेस ला मोठा धक्का, १०८ लोकांचे राजीनामे 

Spread the love

गोवा / विशेष प्रतिनिधी

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे गोवा दौऱ्यावर जाण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. काँग्रेसच्या सुमारे १०८ बूथ लेव्हल एजंट्स (BLA-2) यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे.

काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा पत्रांच्या प्रतीही सार्वजनिक केल्याचे सांगितले जात आहे.

बूथ पातळीवरच मोठी नाराजी

कोणत्याही राजकीय पक्षाची खरी ताकद ही तळागाळातील कार्यकर्त्यांवर अवलंबून असते. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने बूथ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने गोवा काँग्रेसच्या संघटनात्मक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, खर्गे यांच्या गोवा दौऱ्यात बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर भर दिला जाणार असल्याची चर्चा असतानाच ही बाब समोर आली आहे.

निर्णयप्रक्रियेवर नाराजी?

काही कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या बैठका, संघटनात्मक निर्णय आणि निवडणूक नियोजनात तळागाळातील कार्यकर्त्यांना पुरेसे स्थान मिळत नसल्याची नाराजी व्यक्त होत असल्याचे सांगितले जाते.

महत्त्वाचे निर्णय काही मोजक्या नेत्यांच्या प्रभावाखाली घेतले जात असल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. त्यामुळे या नाराजीची कारणे आता काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी चिंतेचा विषय ठरू शकतात.

प्रदेशाध्यक्ष बदलानंतरही अस्वस्थता?

गोवा काँग्रेसमधील काही संघटनात्मक बदलांनंतरही नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा आहे. अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वाशीम खान, सोशल मीडिया विभागाशी संबंधित पदाधिकारी आणि काही कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईमुळे पक्षांतर्गत मतभेद वाढल्याचे बोलले जात आहे.

खर्गे नाराजी दूर करणार?

एकीकडे काँग्रेसकडून बूथ पातळीवरील संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे याच स्तरावरील १०८ पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गोवा दौऱ्यात या नाराजीची दखल घेतली जाणार का आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून मतभेद दूर केले जाणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close