खरच पडतो का सोन्याचा पाऊस ?
बीड / नवप्रहार न्यूज नेटवर्क
सोन्याचा पाऊस पडणे ही आख्यायिका वाटत आली तरी कसबा बीड परिसरातील रहिवाश्यांना या बाबीचा प्रत्यय येतोय. कोल्हापूरच्या शिलाहार राजवंशाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कसबा बीड गावात सोन्याचा पाऊस पडतो ही अख्यायिका गेल्या अनेक शतकांपासुन प्रचलित आहे. अनेक गावकऱ्यांना गावभागात अशा प्रकारच्या सुवर्णमुद्रा, सुवर्णालंकार यापूर्वी सापडले आहेत आणि अजुनही सापडत आहेत.
स्थानिक भाषेत या सुवर्णमुद्रांना बेडा असे संबोधले जाते. ७ मे रोजी कसबा बीड गावच्या ग्रामस्थ सुनिता रमेश कुरणे यांना एक बेडा सापडला आहे. महारकी परिसरातील संतोष वरूटे यांच्या शेतात काम करत असता त्यांना हा बेडा सापडला. सदर बेडा ७ मिमीचा असुन याचे वजन ०.७८ ग्रॅम इतके आहे. यावर अस्पष्ट फुलछाप अंकण दिसते.
मागील दोन वर्षात कसबा बीड गावात सोने सापडण्याचा प्रकार बऱ्याच वेळा घडुन आला आहे. या वर्षातील ही दुसरी घटना आहे. एवढ्या लहानशा तुकड्यावर इतके बारीक अंकण करण्याचे कसब पाहून आश्चर्य वाटल्यावाचुन राहत नाही. गावात सापडणारे असे हे बेडे प्राचीन कसबा बीडच्या गतवैभावाची जणू साक्ष देत आहेत.
आजही कसबा बीडमध्ये अशा बेड्यांना दैवी आशिर्वादाच्या स्वरूपात पुजले जाते. कसबा बीडच्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन, संवर्धन आणि संशोधन करणारी यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी कसबा बीड ही संघटना अशा सुवर्णमुद्रांची माहिती संकलित आणि प्रसारित करते.