शंकेचे भूत मनात घुसले आणि कुटुंबीय मुलं व आजीला मुकले
चुरू ( राजस्थान ) / नवप्रहार मीडिया
मनुष्याच्या मानगुटीवर शंकेचे भूत सवार झाले की मग तो समजावण्या पलीकडे जातो. जुने लोकं जे म्हणतात की शंकेवर जगात कोणतेही औषध नाही अगदी तसाच प्रकार या प्रकरणात घडला आहे.
राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातल्या एका घरात तीन जणांचा एकापाठोपाठ मृत्यू झाला. त्यांचे मृत्यू रहस्यमय होते. एकाच प्रकारे तिघांचाही मृत्यू झाला. त्यानंतर घरात ठिकठिकाणी आपोआप आग लागायची. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एक पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवला. पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून जी माहिती समोर आली, त्यावरून आरोपीचा शोध लागला. या घटनेतल्या आरोपीला बघून पोलिसही चक्रावले.
या घटनेत सर्वांत आधी मरणारी आजी एकदम ठणठणीत असते, अचानक तिला उलट्या होतात आणि तिचं निधन होतं. या घटनेला जेमतेम 12 दिवस झाले असताना पुन्हा घरी एक मृत्यू होतो. चार वर्षांच्या गर्वितचा जीव गेला. त्याला सकाळी सहा वाजता उलट्या झाल्या आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या दुहेरी धक्क्यातून कुटुंबीय सावरण्यापूर्वीच 15 दिवस उलटले आणि घरातला वंशाचा दुसरा दिवाही मरण पावला. 28 फेब्रुवारी रोजी कुटुंबातला सात वर्षांचा मोठा मुलगा अनुराग याचंही निधन झालं. सकाळी त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्याचे कुटुंबीय त्याला दवाखान्यात नेण्याआधीच त्याचाही मृत्यू झाला. या तिघांचाही मृत्यू एकाच प्रकारे झाला होता. आधी उलट्या आणि मग जीव जायचा. या तिघांच्याही निधनानंतर अचानक घरात आग लागणं सुरू झालं. आग घरात केव्हाही, कुठेही लागायची.
आता प्रश्न असा आहे की हा मृत्यू आणि आगीमागचं सत्य काय आहे? हा निव्वळ योगायोग आहे का? की या सगळ्यामागे कुणी षड्यंत्र रचलं आहे? कोणी ठरवून या तिघांना मारलं की नेमकं त्या तिघांनाच असं काय झालं की एकाच पद्धतीने त्यांचे मृत्यू झाले. ही घटना राजस्थानमधल्या चुरूमधल्या भैंसली गावात घडली. 1 फेब्रुवारीपासून मृत्यू व आगीच्या घटना सुरू झाल्या. सर्वांत आधी 82 वर्षीय कस्तुरी यांचं अचानक निधन झालं. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आणि त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. नंतर दोन मुलांचे जीव गेले.
हे तिन्ही मृत्यू अजिबात सामान्य वाटत नाहीत. जर एखादा आजर असता तर त्याबद्दल कळलं असतं; पण अचानक झालेल्या या मृत्यूमुळेच संशय निर्माण होतो. कुटुंबीयांना मृत्यूमागची कारणं समजण्याआधी घरात आग लागली. शेवटच्या मृत्यूच्या एका दिवसानंतर 29 फेब्रुवारी रोजी घरात आग लागली. कधी भिंतीवर लटकवलेल्या कपड्यात, कधी बिछान्यात, कधी जनावरांच्या चाऱ्यात, तर कधी इतर कुठल्या तरी वस्तूला आग लागायची.
गावात भीतीचं वातावरण
या आगीच्या रहस्यमय घटनेमुळे पीडित कुटुंबासह गावातले सर्व लोकही घाबरू लागले. आग लागल्यास ती तात्काळ विझवता यावी म्हणून कुटुंबीयांनी घरातलं सगळं सामान बाहेर काढलं. दुसरीकडे ग्रामस्थांनी दोन स्प्रे मशीन्स आणि पाण्याच्या दोन टाक्यांची व्यवस्था केली, जेणेकरून आग लागल्यास ती लगेच विझवता येईल.
सीसीटीव्ही फुटेजही जळून खाक
या आगीचं सत्य जाणून घेण्यासाठी घरातील लोकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले; पण एके दिवशी कॅमेऱ्याचा डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर म्हणजेच डीव्हीआर जळाला. हे कॅमेरे 3 मार्चला लावले आणि त्यानंतर एकदाही आग लागली नाही. यादरम्यान जनावरांच्या गोठ्यात आग लागली. त्यानंतर 5 मार्चला घरात आग लागली ती थेट डीव्हीआरमध्येच. मग घरातल्या लोकांना या घटनेमागे कुणाचा तरी हात असल्याचा संशय येऊ लागला. कारण पुरावे नष्ट करण्यासाठी डीव्हीआर जाळल्याचं स्पष्ट झालं.
घरात उरले फक्त चार जण
ज्या घरात हे सगळं घडत होतं, तिथं सात जण राहायचे. 33 वर्षांचा भूप सिंह, त्याची 29 वर्षांची पत्नी मेनका व त्यांची चार व सात वर्षांची गर्वित व अनुराग नावांची मुलं, भूप सिंहची 82 वर्षांची आजी कस्तुरी, त्याचे 82 वर्षांचे आजोबा हरी सिंह, त्याची आई संतोष हे सात जण तिथे राहायचे. भूप सिंहच्या वडिलांचं निधन झालं, मग आजी व तिच्या दोन नातवांचा मृत्यू झाला. त्यानंतर घरात भूप सिंह त्याची पत्नी, आई व आजोबा असे चार जण उरले.
मांत्रिकाची घेतली मदत
घरात घडणाऱ्या घटनांमुळे कुटुंबीयांनी मांत्रिकाची मदत घ्यायचं ठरवलं. त्यांनी 9 मार्चला संध्याकाळी पूजा सुरू केली ती पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होती; पण ही पूजा संपताच पहाटे तीन वाजता पुन्हा आग लागली. पोलिसांना याबाबत कळताच अंधश्रद्धा पसरवण्याच्या गुन्ह्याखाली मांत्रिकांना पकडलं. या घटनेत पोलिसांचा हस्तक्षेप झाला. पोलिसांनी डीएमच्या परवानगीने गर्वितचा मृतदेह खोदून बाहेर काढला. मेडिकल बोर्डमध्ये पोस्ट मॉर्टेम केलं, जेणेकरून त्याच्या मृत्यूचं कारण कळू शकेल. यादरम्यान पोलिसांनी आजबाजूचे लोक, त्याचे नातेवाईक या सर्वांचा तपास करायचा पर्याय ठेवला. या कुटुंबाने घर सोडून गेल्यास कोणाचा फायदा होऊ शकतो का, या अँगलनेही पोलिसांनी तपास केला.
आगीचा केमिकल लोचा
कॅल्शियम पावडर पाण्याच्या किंवा ओलसर हवेच्या संपर्कात येताच जळू लागते. शिवाय त्याच्या नेचरमुळे त्यापासून स्फोट होण्याचा धोका असतो. त्याचप्रमाणे सोडियम धातूही पाण्याच्या संपर्कात आल्यावर जळू लागतो. त्याचा छोटासा तुकडा पाण्यात टाकला तरी तो जळू लागतो. याशिवाय अनेक रासायनिक घटक आहेत, ज्यांमुळे आग लागते किंवा धूर निघतो. यामध्ये गॅसोलीन म्हणजे नेपलम, थर्माइट, पांढरा फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांचा समावेश होतो.
पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर
गर्वित नावाच्या मुलाचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढून पोस्ट मॉर्टेमला पाठवला होता. तसंच व्हिसेरा तपासासाठी पाठवला होता. दोन्हीचे रिपोर्ट आल्यावर या प्रकरणाची दिशाच बदलली. गर्वितचा मृत्यू विषामुळे झाला होता. त्याचप्रमाणे त्याची आजी व अनुरागचाही मृत्यू झाला होता. म्हणजेच गर्वितप्रमाणेच त्यांनाही विष देण्यात आलं होतं.
घरातच होता आरोपी
तिघांना हे विष कोणी दिलं आणि घरातल्या गूढ आगीशी या मृत्यूंचा काय संबंध, याचं उत्तर तपासातून समोर आलं. ही आग आपोआप लागली नव्हती तर तो ठरवून रचलेला एक कट होता. तिघांचे मृत्यूही त्याच कटाचा भाग होते. खून करणारा दुसरा कोणी नसून त्या घराचा प्रमुख आणि मरण पावलेल्या दोन मुलांचा बाप भूप सिंह होता. त्याने आपल्या दोन मुलांसह आपल्या आजीची हत्या केली होती.
बार्बिट्यूरेट नावाच्या विषाचा वापर
पोस्ट मॉर्टेम आणि व्हिसेरा रिपोर्टनुसार, गर्वितचं निधन बार्बिट्यूरेट नावाच्या विषामुळे झालं. त्याला विष कोणी दिलं, याचा शोध पोलीस घेऊ लागले. पोलिसांचा सर्वांवर संशय होता. त्यामुळे ते बारीक लक्ष ठेवून होते. याचदरम्यान कळालं की भैंसली गावात भूप सिंहचं मेडिकल आहे. शिवाय त्याने जीएनएम कोर्सही केला आहे. एवढंच नाही तर काही वर्षांपूर्वी त्याने राजगडच्या भगवानी देवी हॉस्पिटलमध्ये कंपाउंडर म्हणूनही काम केलं होतं. म्हणजे भूप सिंहला औषध आणि विषाची संपूर्ण माहिती होती. यानंतर भूप सिंह व त्याच्या पत्नीला ताब्यात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला; पण त्याच्या पत्नीला काहीच माहिती नसल्याचं सुरुवातीलाच स्पष्ट झालं. मग भूप सिंहने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आधी आजीला खोकल्याच्या औषधातून विष दिलं आणि नंतर दोन्ही मुलांना विष दिलं.
आग लावण्यासाठी सोडियमचा वापर
28 दिवसांत घरातील तीन लोकांचा मृत्यू झाल्यामुळे कोणताही संशय निर्माण होऊ नये, म्हणूनच भूप सिंहने आणखी एक कट रचला. या मृत्यूंबाबत गावात चर्चा सुरू झाल्यावर त्याने संधी साधून या प्रकरणाचा जादूटोण्याशी संबंध जोडण्याचा निर्णय घेतला. भूप सिंहला सोडियमबद्दल माहिती होती. त्याने तिसऱ्या मृत्यूनंतर घराच्या वेगवेगळ्या भागात सोडियम टाकून आग लावायला सुरुवात केली. कपडे, अंथरूण, जनावरांचा चारा आणि स्वयंपाकघरात सोडियम टाकलं, त्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपोआप आग लागायची. डीव्हीआरही त्यानेच पेटवलं; पण पोलिसांची एंट्री झाल्यावर भूप सिंह घाबरला आणि आग लागायचं आपोआप थांबलं.
गर्वितच्या मृतदेहामुळे भूप सिंहचा पर्दाफाश
भूप सिंहने ठरवून खून केले. आजी आणि मोठ्या मुलाला त्याने अग्नी देऊन अंत्यसंस्कार केले; पण लहान मुलाच्या निधनानंतर गावातल्या प्रथेप्रमाणे त्याचा दफनविधी करण्यात आला. त्यामुळे तपास करताना पोलिसांनी गर्वितचा मृतदेह बाहेर काढून पोस्ट मॉर्टेम केलं. गर्वितच्या पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमुळे भूप सिंहने केलेला गुन्हा उघडकीस आला.
मुलांना मारण्याचं कारण काय?
भूप सिंहने आपल्या दोन मुलांना आणि आजीला का मारलं, याचं कारण धक्कादायक आहे. खरं तर तो फक्त दोन मुलांनाच मारणार होता, पण लोकांना संशय येऊ नये म्हणून त्याने आजीलाही मारलं. भूप सिंहला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, ही दोन्ही मुलं आपली नाही, असं त्याला वाटायचं त्यामुळे त्याने त्यांचा खून करायचं ठरवलं; पण फक्त दोन मुलांची हत्या केली तर त्याच्यावर संशय येऊ शकतो, अशी भीती त्याला होती. कारण पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याने अनेक वेळा भांडणं केली होती. कदाचित त्याच्या पत्नीला लगेच संशय आला असता म्हणून त्याने प्लॅन बदलला. सर्वांत आधी आजीला विष देऊन मारलं, मग मुलांना विष देऊन मारलं. चुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूप सिंहने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी त्याच्या पत्नीला सोडून देण्यात आलंय.