हिवाळी अधिवेशनात ‘गुरुदेव’चे अर्धनग्न आंदोलन पारधी,शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचा आवाज दणाणला
यवतमाळ : जिल्हास्तरावर शेतकरी,दिव्यांग,पारधी बांधव तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी आज शुक्रवारी हिवाळी अधिवेशनावर सर्वसामान्यांच्या आवाजाचे नेतृत्व केले.त्यांच्या या अर्धनग्न आंदोलनाची चर्चा विधिमंडळात झाली.परंतु,मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रवेशद्वारावर आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादाची ठिणगी उडाली
गुरुदेव युवा संघाने शेतकरी,पारधी,सर्वसामान्यांच्या तक्रारी तसेच कार्यालयीन भ्रष्टाचारावर जिल्हा तसेच आयुक्त स्तरावर तक्रारी दाखल केल्या आहे.परंतु,या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने गेडाम यांनी थेट हिवाळी अधिवेशनाला लक्ष्य केले.आज २० डिसेंबरला नागपुरातील यशवंत स्टेडियमपासून या अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात झाली.प्रशासकीय सावळागोंधळ,अंतर्गत भ्रष्टाचार तसेच सामान्यांच्या प्रश्नांना या मोर्चातून उजागर करण्यात आले.संघाचे अध्यक्ष गेडाम यांनी जोरदार निदर्शने करून हिवाळी अधिवेशनातील मंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले.जिल्हास्तरावर दाखल मागण्यांची पूर्तता तसेच प्रशासकीय भ्रष्टाचार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अपयशी ठरत आहे.प्रशासकीय कारभार त्यांच्या नियंत्रणापलीकडे गेल्याने प्रशासकीय अराजकता माजली आहे.सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नसल्याने त्यांचाही प्रशासनावरील विश्वास उडत चालला आहे.यावर वेळीच समाधान निघत नसल्याने मोर्चा काढण्याची वेळ आल्याचे गेडाम यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नसल्याने गेडाम यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला वृत्त लिहीपर्यंत हा पोलिसांसोबत वाद असाच सुरु होता
या समस्यांच्या पूर्ततेसाठी अर्धनग्न
नेर तालुक्यातील आजंती येथील ५६ पारधी बांधवांना जागेचे पट्टे,घरकुल तसेच मूलभूत सुविधांची पूर्तता,झरी तालुक्यातील सुरला येथील शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे,दिव्यांगांच्या अर्थसहाय्य,योजना तसेच रोजगाराविषयक मागण्या यासोबतच उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अनागोंदी,जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मनमर्जीने फोफावलेला भ्रष्टचार तसेच शासकीय रुग्णालयातील गैरसुविधेवर समाधान मिळावे याकरिता अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.त्यांच्याकडून समाजातील या दुर्लक्षित घटकासाठी काम केले जाते.अल्पावधीतच त्यांचे संघटन भक्कम झाल्याने त्यांना जनाधार लाभत आहे.या मोर्चात जवळपास शेकडो मोर्चेकरी सहभागी झाले होते.