क्राइम

राजकीय नेत्याच्या माजी स्वीय सहायकला हेरगिरी प्रकरणात अटक 

Spread the love

जैसलमेर (राजस्थान ) l नवप्रहार ब्युरो

                        जम्मू काश्मीर मधील फळगाणी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोड वर आल्या आहेत. पाकिस्तान साठी हेरगिरी करणारे लोक या यंत्रणेच्या रडारवर आहेत.

अशातच राजस्थानमधील जैसलमेरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी मोठी कारवाई करत एका सरकारी कर्मचाऱ्याला अटक केली आहे. शकूर खान असे या गुप्तहेराचे नाव असून सुरक्षा यंत्रणांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

ऑपरेशन सिंदूर नंतर गेल्या काही दिवसांत अनेक पाकिस्तानी हेरांना अटक करण्यात आली आहे. आता सीआयडीने पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली राजस्थानमधून शकूर खानला अटक केली आहे. शकूर खान हा मंगलिया जिल्हा रोजगार कार्यालयात लिपिक असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शकूर खान काँग्रेस नेत्याचा माजी स्वीय सहाय्यक आहे. अनेक वर्षांपासून पाकिस्तानला गोपनीय माहिती पाठवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. शकूर काही काळापूर्वी विभागाला माहिती न देता पाकिस्तानला गेला होता. त्याने विभागीय परवानगीशिवाय किमान सहा-सात वेळा पाकिस्तानला प्रवास केल्याचे समोर आलं आहे.

राजस्थानातील जैसलमेर येथील सरकारी कार्यालयातून शकूर खानला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याची विविध यंत्रणांकडून त्याची सतत चौकशी केली जात आहे. चौकशीदरम्यान खानने अनेक खुलासे केले आहेत. चौकशीदरम्यान शकूरने सांगितले की तो गेल्या काही काळात ७ वेळा पाकिस्तानला गेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला भेटी दिल्याचे समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी कसून चौकशी सुरू केली आहे. खान हा काँग्रेस सरकारमधील मंत्री सालेह मोहम्मद यांचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करत होता. सालेह मोहम्मद आणि आरोपी खान दोघेही एकाच गावातील आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, शकूरने पाकिस्तानी उच्चायुक्तालयाद्वारे आयएसआयच्या हँडलर्सशी संपर्क साधला आणि संवेदनशील माहिती शेअर केली. त्याच्या फोनमध्ये लष्करी कारवायांशी संबंधित कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ आढळले नाहीत. मात्र खानच्या मोबाईलमध्ये अनेक अज्ञात पाकिस्तानी नंबर सापडले आहेत, ज्याबद्दल त्याने काहीही सांगितलेले नाही. तसेच अनेक फायली डिलिट केल्या आहेत ज्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल.

शकूरला ताब्यात घेतल्यानंतर त्याला जयपूरला नेण्यात येत आहे. जैसलमेरचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानच्या संशयास्पद हालचालींची माहिती वरिष्ठ मुख्यालयाकडून मिळाली होती, त्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. गुप्तचर संस्था काही काळापासून त्याच्यावर लक्ष ठेवून होत्या कारण त्यांना पाकिस्तानी दूतावासातील एका अधिकाऱ्याशी आणि आयएसआयशी त्याचे संबंध असल्याची माहिती मिळाली होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close