वीज ग्राहकांनी अडचणीच्या वेळेस महावितरणाला सहकार्य करावे
बेसा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मेरमध्ये बिघाड
दोन ते तीन दिवसात समस्या दूर होईल नागरिकांनी सहकार्य करावे
नागपूर: : महापारेषणच्या बेसा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मेरमध्ये मोठा बिघाड झाल्याने महाल विभागातील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळण्यास अडचण निर्माण होत असून महावितरणने पर्यायी व्यवस्था करून ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून कसून प्रयत्न करित आहेत. परंतु रात्रीच्या वेळी वीज मागणी जवळपास दुपट्ट होत असल्याने वीज यंत्रणेवर ताण वाढून या भागात रात्रीच्या वेळेस नागरिकांना विस्कळीत वीज पुरवठ्याचा सामना करावा लागू शकतो. वीज ग्राहकांनी या अडचणीच्या काळात सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे. तसेच ही समस्या दोन ते तीन दिवसात दूर होईल. असा विश्वास व्यक्त केला आहे. नागपूर शहरातील महाल विभाग अंतर्गत असणाऱ्या भागाला महापारेषणच्या बेसा उपकेंद्राच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येतो. महापारेषणच्या बेसा १३२/११ केव्ही उपकेंद्रातून महावितरणच्या १३ वीज वाहिन्यांना पुरवठा करण्यात येतो व या वीज वाहिन्यांनाच्या माध्यमातून महावितरणकडून दिघोरी, जानकी नगर, महालक्ष्मीनगर, ताजबाग, मानेवाडा, बेसा, विहीरगाव या भागात वीज पुरवठा करण्यात येतो. रविवारी २१ मे रोजी महापारेषणच्या बेसा उपकेंद्रातील २५ एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मेर नादुरुस्त झाल्याने महावितरणच्या वीज ग्राहकांना त्याचा फटका बसला व ग्रेसिया कॉलनी, रामकृष्ण नगर, सरस्वती नगर, अध्यापक नगर, महाकाली नगर, महालक्ष्मी नगर, ताजबाग, न्यू सुभेदार, जुना सुभेदार, श्रीकृष्ण नगर, आशीर्वाद नगर, भोलेबाबा नगर, उदय नगर, विहिरगाव, लवकुश नगर, दिघोरी टोल नाका, नरसाळा, टेकप सिटी या भागातील वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. १३ पैकी ४ वाहिन्यांवर सद्यस्थितीत इतर उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यात येत आहे. तसेच उर्वरित ९ वीज वाहिन्यांना १३२ केव्ही बेसा उपकेंद्रातील दुसऱ्या २५ एम व्ही ए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर द्वारे वीज पुरवठा करण्यात येत आहे. महापारेषण कंपंनीने नादुरुस्त ट्रान्सफॉर्मेर बदलण्यासाठी लगेचच कार्यवाही सुरु केली आहे. २५ एमव्हीए क्षमतेचे नवीन ट्रान्सफॉर्मेर उपलब्ध झाले असून ते बदलण्याची कार्यवाही सुरु आहे. परंतु त्यासाठी दोन ते तीन दिवसाचा अवधी लागू शकतो. त्यामुळे महावितरणने या ट्रान्सफॉर्मेरवर अवलंबून असलेल्या वीज वाहिन्यांवरील ग्राहकांना पर्यायी व्यवस्थेतून वरील प्रमाणे वीज पुरवठा सुरु केला आहे. वीज पुरवठा बाधित असलेल्या भागातील विजेची मागणी दिवसा सुमारे १८ मेगा वॅट आहे. मात्र सायंकाळी ७ ते पहाटे ४ या दरम्यान हिच विजेची मागणी दुप्पट होऊन तब्बल ३२ मेगा वॅटपर्यंत पोहचत आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्थेतून वीज पुरवठा करतांना महावितरणच्या यंत्रणेवर प्रचंड ताण येऊन यंत्रणनेत बिघाड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सायंकाळी ७ ते पहाटे ४ या दरम्यान या भागातील वीज ग्राहकांचा वीज पुरवठा चक्राकार पद्धतीने एक ते दोन तासांसाठी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी या अडचणीच्या काळात जास्त वीज लागणाऱ्या एसी व इतर साधनांचा वापर कमी करून महावितरणला सहकार्य करावे अशी विनंती महावितरणने केली आहे. महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता समीर टेकाडे, महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे व इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दुपारी महापारेषणच्या उपकेंद्राला भेट दिली व दुरुस्ती कार्याचा आढावा घेतला तसेच लवकरात लवकर दुरुस्ती करण्याबाबत निर्देश दिले. दक्षिण नागपुर या एरियातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सिद्धुजी कोमजवार यांनी अभियंता यांची भेट घेऊन वरच्या अधिकाऱ्यांची बोलणं केलं व संपूर्ण माहिती घेतली असता सिद्दु कोमजवर हे आम जनतेला आवाहन करित आहे की, तांत्रिक बिघाड आल्यामुडे त्याला दोन ते तीन दिवस दुरुस्तीला लागतील. या भागातील नागरिकांनी महावितरणास सहकार्य करावे असे आश्वासन सिद्धु कोमजवार यांना अभियंत्यानी दिले.