जिल्ह्यातील खेळाडूंनी ग्रिष्मकालीन कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावे- अविनाश निंबार्ते

ग्रिष्मकालीन नि:शुल्क कुस्ती प्रशिक्षण शिबिराची सुरुवात
भंडारा : प्रतिकुल परिस्थितीवर मात करून कुस्ती पट्टू स्व. खाशाबा जाधव यांनी देशाच्या पातळीवर भारताचे नाव लौकिक केले आहे. म्हणून जिल्ह्यातील खेळाडूंनी ग्रिष्मकालीन नि:शुल्क कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावे असे प्रतिपादन राज्य क्रीडा मार्गदर्शक अविनाश निंबार्ते यांनी केले.
ते क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, भंडारा व जाणता राजा कुस्ती स्पोर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दहा दिवशीय ग्रिष्मकालीन नि:शुल्क कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करतांना बोलत होते.
सदर कुस्ती प्रशिक्षण शिबिर क्रीडा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते व जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य क्रीडा मार्गदर्शक अविनाश निंबार्ते, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, क्रीडा मार्गदर्शक विशाल बान्ते, कुस्ती प्रशिक्षक अशोक बन्सोड, मार्गदर्शक विलास केजरकर, सामाजिक कार्यकर्ते बादल ठाकुर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वीर हनुमान (बजरंग बली) यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलित व मार्ल्यापण करून कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी ऑलिपीकवीर स्व. खाशाबा जाधव यांची जिवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान याबाबत आणि ग्रिष्मकालीन कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा महत्त्वाकांक्षी विषयावर खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांनी ग्रिष्मकालीन कुस्ती प्रशिक्षण शिबिराला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार विलास केजरकर यांनी केले.
प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वीतेकरीता तुषार बोरकर, राकेश हटवार, अक्षय पुडके, शुभम साकुरे, पल्लवी शिवरे, वैशाली बसीने, सारंग राखते तसेच क्रीडा क्षेत्रात भाग घेणाऱ्या खेळाडू विद्यार्थी -विद्यार्थिनींनी सहकार्य केले.