वडकी परिसरात गॅस सिलिंडरचा काळाबाजार
वडकी/प्रतिनिधी
वडकीसह परिसरातील हॉटेल व ढाब्यांसाठी बेकायदेशीरपणे गॅस एजन्सीकडून बिनदिक्कतपणे सुट्टीच्या दिवशीही काळ्याबाजाराने सिलिंडरची विक्री होत आहे. याबाबत पुरवठा विभाग व गॅस कंपन्या दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार नागरिक करीत असले तरी घरगुती गॅस धारकांना सिलिंडरकरिता मनस्ताप सहन करावा लागत असून, बेकायदेशीरपणे हॉटेल व्यावसायिकांसाठी तात्काळ सुविधा पुरविल्या जात आहेत. घरगुती सिलिंडर घेण्याकरिता गॅस कंपन्यांनी ऑनलाईन बुकिंग केल्याशिवाय एजन्सीकडून सिलिंडर दिला जात नाही. तशा स्पष्ट सूचना देखील प्रत्येक एजन्सीच्या दिल्या आहेत. मात्र या सूचना फक्त घरगुती गॅस धारकांसाठीच असल्याचे चित्र वडकी परिसरामध्ये पाहावयास मिळत आहे. हॉटेल, चायनीज सेंटर, स्वीट होमच्या दुकानदारांना बुकिंगशिवाय काळ्या दराने कोणत्याही दिवशी अतिशय बिनदिक्कतपणे सिलिंडरचा पुरवठा केला जात असल्याचा प्रकार घडत आहे. घरगुती गॅसधारकांना दुय्यम वागणूक आणि काळ्याबाजाराने सिलिंडर घेणाऱ्यांना विनाबुकिंग तत्पर सेवा गॅस एजन्सी देत असल्याच्या तक्रारी वारंवार नागरिकांकडून होत होत्या; मात्र पुरवठा विभाग आणि गॅस कंपन्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पुरवठा विभागाची डोळेझाक
व्यावसायिकांना मात्र जादा पैसे देऊन घरगुती सिलिंडर वेळेवर मिळत आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांना जादा पैसे देऊनही सिलिंडर मिळणे अवघड झाले आहे. सिलिंडर वितरण व्यवस्थेकडे महसूल प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु ही जबाबदारी संबंधित अधिकारी घेण्यास टाळाटाळ करीत आहे. अर्थपूर्ण व्यवहार होत असल्यामुळे डोळेझाक होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून प्रशासनाच्या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. वितरक आणि ग्राहकांमध्ये वाद सुरू असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. ‘गाडी आली नाही’ असे सांगून सिलिंडर नाकारले जात आहे. गॅस एजन्सींनी आपले मनमानी धोरण राबवून ग्राहकांची अडवणूक सुरू केली असून त्यावर नियंत्रण ठेवायला हवे, असे मत एका ग्राहकाने बोलताना व्यक्त केले.