पत्नीच्या मारेकऱ्याला अटक

अमरावती /प्रतिनिधी
पत्नीला दारू पाजून ती गाढ झोपेत असताना तिच्या डोक्यावर उखळाने प्रहार करून तिची हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य म्हणजे यावेळी पत्नीने स्वतःला वाचविण्यासाठी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता पतीने तिच्या गळ्यावर चाकूने वार करत तिला संपवले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहून ठेवला. पण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. घटना राजापेठ पोलिस ठाण्याच्या गुरुकृपा कॉलनी येथे घडली आहे.
नीलिमा ऊर्फ पिंकी खरबडे (४५) असे मृत महिलेचे तर सनी उर्फ नितीन इंगोले (३२, अशोक कॉलनी) असे नीलिमाच्या मारेकरी पतीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनुसार, सनी उर्फ नितीन इंगोले (३२, अशोक कॉलनी) असे नीलिमाच्या मारेकरी पतीचे नाव आहे. तो भूजल सर्वेक्षणच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात कार्यरत आहे. त्याच्याशी नीलिमाचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्यापूर्वी पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर ती एकटी राहत होती. नीलिमाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्याने तिच्यावर उखळाचा दगड आणि चाकूने वार करून हत्या केली.
सनी सरकारी कर्मचारी असल्याने हा विवाहच मुळी अवैध होता. त्यात तिने दबाव आणण्यासाठी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामुळे संतापलेल्या सनीने हत्येचा कट रचला.
अशी केली हत्या
३० नोव्हेंबरला रात्री ८:३० वाजता घरकाम करणारी महिला गेल्यानंतर सनी नीलिमाच्या घरी दारूच्या बाटल्या घेऊन गेला. दोघांनीही मद्यपान केले. ती गाढ झोपेत असताना सनीने तिच्या डोक्यावर उखळाने वार केले. तिला जाणीव होताच ती ओरडली तेव्हा त्याने तिच्या मानेवर चाकूने वार केला. हत्येनंतर सनी मागच्या दाराने बाहेर पडला.
नाल्यात फेकल्या हत्येत वापरलेल्या वस्त
हत्येत वापरलेला उखळ, दारूचे दोन ग्लास, नीलिमाचा मोबाइल, जेवणाची प्लेट, कॅमेऱ्याचा डीव्हीआर अशा वस्तू सनीने गोळा केल्या आणि इतवारा बाजार रोडवरील नाल्यात फेकून दिल्या.
यंदा २९ ऑगस्ट रोजी सनीने तिच्याशी लग्न केले. आता ती त्याला त्याच्या घरी घेऊन जाण्याचा आग्रह करीत होती.
तपासात सदर गुन्हा नीलिमा हिचा दुसरा पती नितीन इंगोले याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने त्याला राहत्या घरून ताब्यात घेतले. कसून चौकशी करण्यात आल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नितीन व नीलिमा यांचे प्रेमसंबंध होते. दोन महिन्याअगोदर नितीनच्या इच्छेविरुद्ध त्याचे नीलिमा यांच्यासोबत लग्न झाले. त्यावरून त्यांच्यात सतत वाद होत होते. त्याला कंटाळून नितीनने नीलिमा यांचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही डीव्हीआर व नीलिमा हिचा मोबाइल नितीन हा सोबत घेऊन गेला. तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने नीलिमा यांच्या घरातील भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहून ठेवल्याचेही चौकशीत समोर आले. पोलिसांना पहिल्या दिवसापासून सनीवर संशय होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.




