आयुध निर्माणी डिफेन्स क्षेत्रातील बिबट्याच्या वाढत्या कारवायांमुळे चिंता!
हरणाच्या शिकारीचा व्हीडीओ व्हायरल!
कमिटी स्थापन करून निरीक्षण सुरु –वनक्षेत्राधिकारी रीना राठोड !
वाडी प्रतिनिधी
ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी डिफेन्स क्षेत्रातील जंगल परिसरात गेल्या सात दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून एका माकडाचा मृतदेह आणि शनिवारी रात्री हरणाचा मृतदेह आढळून आल्याने परिस्थितीचे गांभीर्य वाढले आहे. डिफेन्स वनक्षेत्रात हा बिबट्या आढळून आल्याने आयुध निर्माणी अंबाझरी प्रशासनाने एक परिपत्रक जारी करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते.
हा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याने सुरक्षा कर्मचारी,आयुध निर्माणीशी संबंधित अधिकारी आणि हिंगणा वनविभागाचे पथक सीसीटीव्हीद्वारे या बिबट्याची पाहणी करण्यात गुंतले होते. मात्र आजपर्यंत बिबट्याला जेरबंद करणे आवाक्याबाहेर राहिले. दरम्यान, शुक्रवारी आयुध निर्माणी वसतिगृह परिसरात एक माकड मृतावस्थेत आढळून आले. आणि शनिवारी रात्री तलाव ते मुख्य रुग्णालय रस्त्यालगत एक मृत हरिण आढळून आले. हरणाच्या शरीरावर खोल खड्डा दिसला. कदाचित काही विचलित झाल्यामुळे चिता शिकार खाऊ शकला नाही आणि निघून गेला ही शक्यता असू शकते. यावरून रात्रीच्या वेळी या बिबट्याने हरणाची शिकार केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या मृत हरणाची व्हिडीओ क्लिपही अनेक व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित होताना दिसली. बिबट्याच्या वाढत्या कारवाया पाहता, कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी या चितेंपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग आणि आयुध निर्माणी सुरक्षा विभागाने अधिक सक्रिय होण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात हिंगणा वनपरिक्षेत्र अधिकारी रीना राठोड म्हणाल्या की, परिस्थिती पाहता विशेष समिती स्थापन करण्यात आली असून तपासणीचे काम सुरू आहे तसेच यासंदर्भात निश्चित नियोजन केले जात आहे!