मामीची पती आणि भाच्या विरोधात तर भाच्याची मामी विरोधात तक्रार

संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी
जिल्ह्यातील देवळाई परिसरात एका विवाहितेवर तिचा पती आणि दोन भाच्यांनी वारंवार अत्याचार केल्याची तक्रार विवाहितेकडून करण्यात आली आहे. तर त्यापूर्वी भाच्याने मामी विरोधात तिने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केल्याने प्रकरणं गुंतागुंतीचे झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून सत्य समोर आणण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.
पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, मुलीच्या वाढदिवसानिमित्त घरी आलेल्या भाच्यांसोबत पतीने तिला दारू पाजून जबरदस्ती केली.
हा प्रकार जुलै 2024 पासून मे 2025 पर्यंत सुरू राहिला, तसेच अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केल्याचाही आरोप आहे.
नेमकं प्रकरण काय?
तक्रारीनुसार, पीडित विवाहिता (वय 30) देवळाई भागात राहते. तिच्या मुलीच्या वाढदिवसाला पतीचे दोघे भाचे घरी आले होते. त्या दिवशी पतीने तिला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दोन्ही भाच्यांनीही तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराचा एका भाच्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याआधारे तिला धमकावून शांत बसवले. पीडितेने सुरुवातीला नवी मुंबई येथे तक्रार दाखल केली होती. ही तक्रार काल चिकलठाणा पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.
अधिक माहीती अशी की, या प्रकरणाची दुसरी बाजूही पुढे आली आहे, ज्यामुळे गुंतागुंत आणखी वाढली आहे. चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन भाच्याने सप्टेंबरमध्ये मामीविरुद्ध तक्रार दाखल केली होती की, मामीने त्याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या तक्रारीवरून मामीच्या विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. नंतर पतीच्या लक्षात ही बाब आल्यावर भाच्यावर अत्याचार होत असल्याची माहिती समोर आली.
दोन्ही तक्रारीनंतर हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे, यात एकमेकांविरुद्ध गंभीर आरोप होत आहेत. चिकलठाणा पोलीस या दोन्ही तक्रारींच्या अनुषंगाने तपास करत आहेत.




