महिलेस काठीने मारहाण करून केले जखमी

रोशन खोब्रागडे
लाखनी – तालुक्यातील ग्राम सावरी येथील प्रभाग क्रमांक २ मधील रहीवाशी शालू कमलाकर बागडे (४५) हिला त्याच प्रभागातील युवक रोहन किरण बागडे (२८) याने क्षुल्लक कारणावरून काठीने डोक्यावर मारहाण केली. यात सदर महीला जखमी झाली आहे. ही घटना दि. ९ अॉक्टोंबरला रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली.
प्राप्त माहीतीनुसार रोहन बागडे व जखमी महीला शालू बागडे यांचा मुलगा गौतम बागडे हे दोघेही रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर घराजवळील विहीरीजवळ एकत्र बसले होते. रोहन बागडे या तरूणाने गौतम बागडे याच्या आईला उसणवार पैसे न दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण व मारपीटही झाली. हा सर्व प्रकार घडत असताना शालू बागडे हीने मध्यस्थी केली असता रोहन बागडे याने तिच्या डोक्यावर काठीने मारहाण करून जखमी केले तसेच गौतम बागडे याला मारण्याची धमकी दिली.
सदर घटनेची लेखी तक्रार फिर्यादी गौतम बागडे याने लाखनी पोलीसांत दाखल केली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या शालू बागडे हिच्या वैदयकीय अहवालानुसार आरोपी रोहन किरण बागडे याच्या विरोधात कलम ३२४ , ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.