बंडखोरीने महाविकास आघाडी चे वाढवले टेंशन
भिवंडी / नवप्रहार डेस्क
उद्या दि. 4 नोव्हेंबर रोजी अर्ज परत घेण्याची मुदत संपत आहे.पण महाविकास आघाडी आणि महायुती ला बंडखोरीने पुरते हैराण करून सोडले आहे. आघाडी मध्ये ती थोड्या जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. भिवंडी पूर्वमध्ये महाविकास आघाडीकडून समाजवादी पार्टीचे रईस शेख यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.
शनिवारी संध्याकाळी त्यांच्या समर्थकांनी भिवंडी शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना खासदार बनवण्यासाठी मागील निवडणुकीत भिवंडीत आम्हाला कपिल पाटील यांचे काम करण्यास भाग पाडलं. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची ताकद मोठी असताना सुद्धा ४ पक्ष फिरून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आम्ही काम केलं. प्रत्येक वेळेस आमचा बळी का म्हणून द्यायचा? वरळीत उद्धव ठाकरे यांच्या मुलाला फायदा होईल म्हणून भिवंडीत समाजवादी पक्षाला शिवसेना पक्षाने समर्थन देऊन आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला असून आम्ही हा अन्याय कदापी सहन करणार नसून या निवडणुकीच्या मैदानात लढणार, असा ठाम निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांनी व्यक्त करीत पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे.
‘मी कुणाला हरवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी ही निवडणूक लढवत नसून मला जनतेच्या मदतीने ही निवडणूक जिंकायची आहे असा निर्धार व्यक्त केला आहे.
29 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करताना समाजातील पक्षाचे उमेदवार रईस शेख यांच्या शक्ती प्रदर्शन रॅलीमध्ये काँग्रेसचे खासदार सुरेश टावरे हे सहभागी झाले होते. परंतु आज रुपेश म्हात्रे समर्थकांनी आयोजित केलेला सभेला माजी खासदार सुरेश टावरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते.
याबाबत सुरेश टावरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘समाजवादी पार्टीचे रईस शेख हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्या सोबत होतो. पण त्यांचे पक्षप्रमुख अबु आझमी हे त्यानंतर भिवंडी पश्चिम विधानसभेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस उमेदवार दयानंद चोरगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना तेथे समाजवादी पक्षाच्या रियाज आजमी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा आले म्हणजे त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही. मग आम्ही सुद्धा रुपेश म्हात्रे यांच्यासोबत राहणार’ असा निर्धार व्यक्त केला आहे.