अल्पवयीन मुलीला सिगारेट ,गरम तवा आणि गरम चाकूचे चटके

बेंगळुरू मधून काम करायला आणले होते नागपूरला
नागपूर / नवप्रहार मीडिया
बेंगळुरू वरून घरकाम करण्याकरिता आणलेल्या 10 वर्षच्या अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिला सिगारेट, गरम चाकू आणि गरम ताव्याने चटके देत असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पोलिसांनी पती – पत्नी आणि पत्नीच्या भावावर गुन्हा दाखल केला आहे. मुलीला ती 7 वर्षांची असतानाच नागपूर ला आणण्यात आले होते हे विशेष. पोलिसांनी आरोपी ताहा अरमान इश्तियाक अहमद (वय ३७ रा. अथर्वनगरी, बेसा) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेसा परिसरात ताहा अरमान पत्नी हिना आणि साळा अजहर याच्यासह राहतो. तो प्रापर्टी डीलरचे काम करतो. ताहा याची पत्नी मुळची बंगळुरूची असून तिचा भाऊ अजहर याच्याकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीला सात अपत्य आहेत. त्यापैकी सात वर्षीय मुलीला त्याने तीन वर्षांपूर्वी घरकाम करण्यासाठी नागपुरात आणले.
यावेळी तिघेही मुलीला वेळेवर जेवण न देणे, तिच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त काम देणे आणि मारहाण करणे असे अमानवीय अत्याचार तिच्यावर करायचे. विशेष म्हणजे, तिला सिगारेट, गरम चाकू आणि तव्याचेही चटके द्यायचे.हिनाचा भाऊ हा तिचे शारीरिक शोषणही करायचा. त्यामुळे ती भेदरलेल्या अवस्थेत ती घरी राहायची. विशेष म्हणजे, घराबाहेर जाताना तिला एकटे खोलीत वा कधी बाथरूममध्येही डांबून ठेवले जात होते.
गेल्या तीन वर्षांपासून बालमन हे अत्याचार मुकाट्याने सहन करीत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्या वेदना असह्य झाल्या अन् आरोपींच्या कुकर्माच भंडाफोड झाला. मंगळवारी मुलीला स्नानगृहात बंद करून तिघेही बंगळुरूला गेले. तिला खायला बिस्कीटचे पाकिट दिले. महिलेने हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक विक्रांत सगणे यांनी तिघांवरही गुन्हा नोंदवित, ताहा याला अटक केली. मात्र, हिना आणि तिचा भाऊ अद्याप फरार आहेत.
असा झाला प्रकरणाचा उलगडा –
दरम्यान वीज बिल जमा न केल्याने मंगळवारी महावितरणचे कर्मचारी अर्थवनगरी येथे आले. त्यांनी अरमानच्या घराची वीज कापली. वीज गेल्याने मुलगी घाबरली. चमच्याने तिने स्नानगृहाचा दरवाजा उघडला. ती घरात आली.
खिडकीतील लोखंडी ग्रीलमधून ती कशीबशी घराबाहेर आली. चौकीदाराला ती दिसली. घरी कोणी नाही तू येथे कशी आली, अशी विचारणा चौकीदाराने केली. ती रडायला लागली. शेजारी जमले. एका महिलेने तिला घरी नेले. तिची चौकशी केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.