बंटी जहागिरदार याची हत्या राजकीय वर्चस्व वादातून

अहिल्यानगर / विशेष प्रतिनिधी
जर्मन बेकरी प्रकरणातील आरोपी बंटी जहागिरदार याची हत्या राजकीय वर्चस्व वादातून झाल्याची फिर्याद मृतक बंटीच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत केली आहे. बंटी जहागीरदार याच्या हत्येसंदर्भात पोलिसांनी दोघा हल्लेखोर तरूणांना अटक केली आहे. कृष्णा अरुण शिनगारे (वय २३) व रवींद्र गौतम निकाळजे (वय २३ अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
बंटी जहागीरदार याच्या पार्थिवावर आज, गुरुवारी श्रीरामपूरमध्ये तणावपूर्ण वातावरणात व पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान जागीरदार याचे चुलत बंधू नगरसेवक रईस अब्दुलगनी शेख यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार हत्येमागे राजकीय वर्चस्ववादाचे कारण असल्याचा आरोप केला आहे.
बंटी जहागीरदार हा पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणासह इतर गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. बॉंम्बस्फोट प्रकरणात त्याला उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी जामीन मंजूर केलेला आहे. काल, बुधवारी दुपारी श्रीरामपूरमधील कब्रस्तानात एक अंत्यविधी आटोपून परतणाऱ्या बंटी जहागीरदार याच्यावर मोटरसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. सहा गोळ्या लागून जहागीरदार याचा मृत्यू झाला. त्याच्या समवेत असलेले आमीन गुलाब शेख हेही जखमी झाले.
मृत बंटी जहागीरदार याचे पार्थिव काल रात्री शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले. त्यानंतर आज सकाळी त्याच्या पार्थिवावर श्रीरामपूर शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यास सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान पोलिसांनी आरोपींच्या शोधांसाठी तीन पथके रवाने केली होती. यातील एका पथकाने संगमनेरजवळ दोघ आरोपींना काल रात्रीच अटक केली. या आरोपींनी हत्येची कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
फिर्यादीत तीन भावांची नावे
बंटी जहागीरदार याचे चुलत बंधू नगरसेवक रईस शेख यांनी श्रीरामपूर पोलीसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार राजकीय वर्चस्वातून ही हत्या केल्याचे नमूद केले आहे. तसेच यासंदर्भात तिघा भावांची नावेही फिर्यादीत नमूद केली आहेत. त्यांनी म्हटले की, बंटी जहागीरदार १५ ते २० वर्षापासून राजकारणात सक्रिय होता. त्याची आई श्रीरामपूर पालिकेमध्ये नगरसेविका होती, तिचा मृत्यू झाल्यानंतर माझी पत्नी नगरसेविका होती. बंटी जहागीरदारच्या सामाजिक व राजकीय कामामुळे श्रीरामपूर शहरात व तालुक्यात राजकीय वर्चस्व होते.
सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदाराचे काम केल्यामुळे त्यांचा विजय झाला, तसेच नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षांचे काम केल्याने त्यांचा विजय झाला. श्रीरामपूर शहरात संघटित गुन्हेगारी करणारी टोळी तीन भाऊ चालवत असून बंटी जहागीरदार याच्या राजकीय वर्चस्वामुळे त्यांना गुन्हेगारी व राजकीय क्षेत्रात अडचण निर्माण होत होती.
विधानसभा निवडणुकीत एक भाऊ कमी फरकाने निवडणूक हरल्याचा राग मनात धरून व नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षांसाठी केलेल्या कामाचा राग धरून माझ्या भावाचा मुलांकरवी खून केलेला आहे. एका जणाने जाहीर भाषणातून चिथावणीखोर धमक्याही बंटी जागीरदारला दिल्या आहेत. गोळीबार करताना दोघांनी ‘एकच भाई…’ असे म्हणून आरोपीचा उल्लेखही केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
समर्थकांचे रास्ता रोको
दरम्यान बंटी जागीरदार याच्या पार्थिवावर तणावपूर्ण वातावरणात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठा बंदोबस्त कब्रस्तानात तैनात होता. बंटी जहागीर याचा मृतदेह मौलाना आझाद चौकात आल्यावर नातेवाईक व संतप्त समर्थकांनी रस्ता रोखून धरला. आरोपींना अटक होईपर्यंत पार्थिव हलवणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली होती. अखेर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती दिल्यानंतर जमाव शांत झाला. बंटी जहागीरदार यांच्या निवासस्थानी आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी भेट दिली.
पोलिसांचे समाज माध्यमांवर लक्ष
श्रीरामपूर शहरात मोठा बंदोबस्त तैनात आला असून ‘एसआरपी’च्या दोन तुकड्याही तैनात आहेत. पोलिसांचे समाज माध्यमावर बारकाईने लक्ष असून घटनेसंदर्भात कोणी आक्षेपार्ह, आपत्तीजनक, चुकीच्या माहितीची टिप्पणी केल्यास किंवा आफवा पसरवल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे.




