शाखा अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात…..!

कामाचे बिल काढण्यासाठी मागितली 40 हजारांची लाच,
भंडारा जिल्हा परिषदेत खळबळ,
भंडारा प्रतिनिधी /अजय मते
जलशुद्धीकरण कामाचे बिल काढण्यासाठी ४० हजारांची लाच मागणारा जिल्हा परिषदेतील यांत्रिकी उपविभागातील प्रभारी उपअभियंता सुहास करंजेकर याला दि. २८ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच रक्कम घेतांना रंगेहात पकडले. यामुळे भंडारा जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली. लाचखोर प्रभारी उपअभियंता विरुद्ध भंडारा पोलिसात
गुन्हा दाखल करून अटक केली आहे. भंडारा येथील तक्रारदार कंत्राटदाराने भंडारा जिल्ह्यातील चिखली व लेंडेझरी या दोन गावातील जलशुद्धीकरणाची कामे पूर्ण केली. केलेल्या कामाचे बिल ९ लाख ८० हजार रुपये मंजूर होण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने दोन्ही ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र, वर्क ऑर्डर, कामाचे फोटोग्राफ व इतर कागदपत्रांसह कामाचे बिल यांत्रिकी उपविभागातील प्रभारी उपअभियंता सुहास करंजेकर यांचेकडे सादर केले होते. दि. १७ फेब्रुवारी रोजी संबंधित कंत्राटदाराने प्रभारी उपअभियंत्यांना भेटून त्यांच्या बिलाबाबत विचारणा केली असता सुहास करंजेकर यांनी बिल मंजूर करण्यासाठी बिलाच्या पाच टक्के रक्कम ४९ हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार कंत्राटदाराने याबाबतची तक्रार दि. २५ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता आरोपी प्रभारी उपअभियंता सुहास करंजेकर यांनी तडजोडीअंती ४० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. दि. २८ फेब्रुवारी रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी सुहास करंजेकर यांनी तक्रारदार कंत्राटदाराकडून ४० हजारांची लाच रक्कम स्वतः स्वीकारतांना रंगेहात पकडले. आरोपीला अटक करून त्याचे विरुद्ध भंडारा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे, यांचे मार्गदर्शनात पोउप अधिक्षक डॉ. अरुण लोहार, पोहवा अतुल मेश्राम, मिथुन चांदेवार, पोशि विष्णू वरठी, पोना नरेंद्र लाखडे, आदिंनी केली आहे.
.
प्रभारी उपअभियंत्याची घरझडती
जिल्हा परिषदेतील यांत्रिकी विभागातील उपअभियंता तथा वर्ग दोन मधील शाखा अभियंता सुहास करंजेकर यांना लाच रक्कम स्वीकारतांना अटक केल्यानंतर त्याची घरझडती केली जात आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला. पोलीस तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.