धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणात पोलिसांकडून दोन आरोपींना अटक
अकोला / प्रतिनिधी
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केल्याने दोन समाजात तेढ निर्माण होऊन त्याचे पर्यवसान दंगलीत झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
सदर दोन्ही आरोपींना शनिवारी (ता. २०) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर जिल्हा पोलिस अधीक्षक मोनिका राऊत व एलसीबीचे पीआय संतोष महल्ले उपस्थित होते.
सोशल नेकवर्कींग ॲप इंस्टाग्रामवर एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावतील असा आपत्तीजनक मजकूर प्रसारित करण्यात आला होता. त्यामुळे एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावलेल्या संबंधित समाजाचे नागरिक १३ मे च्या रात्री मोठ्या प्रमाणात रामदास पेठ पोलिस स्टेशनमध्ये जमा झाले होते.
यावेळी पोलिसांद्वारे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच रामदास पेठ पोलिस स्टेशनमध्ये जमलेले नागरिक जुने शहरातील हरिहर पेठ येथे पोहोचले होते. त्यानंतर जुने शहरातील हरिहर पेठ येथे दंगल उसळली होती.
या दंगलीदरम्यान हाणामारी, जाळपोळ, दगळफेकीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यासोबतच अनेक जण जखमी झाले होते. दरम्यान समाज माध्यमावर आपत्तीजनक मजकूर प्रसारित केल्यामुळे रामदास पेठ पोलिसांनी कलम १५३ (अ), २९५ (अ), १८८, १२० (अ), ५०५ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी दंगलसाठी जबाबदार दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे.
दंगल प्रकरणात अटक करण्यात आरोपींची संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे पोलिस या प्रकरणात इतर आरोपींना लवकरच अटक करेल. सध्या सर्वच पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये दंगलीचे आरोपी ठेवलेले असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यासाठी विशेष पथक सुद्धा गठित करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक घुगे यांनी दिली.
आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयाच्या इंस्टाग्रामवर वायरल करून एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्याने याबाबत फिर्यादीने तक्रार दिल्याने पोलिस स्टेशन रामदास पेठ येथे १३ मे रोजी कलम १५३ (अ), २९५(अ), १८८, १२० (अ), ५०५ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दंगल भडकावणाऱ्या एका गटाने १३ मे रोजी रात्री जमाव जमवून, कट कारस्थान रचून, जुने शहरातील हरिहर पेठ, पोळा चौक व इतर ठिकाणी जाळपोळ व दगडफेक केली. त्यासोबतच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.
रामदासपेठ येथील गुन्ह्यातील फिर्यादी व एक इसम या दोघांनी एकमेकांचे मोबाईल फोनद्वारे सोशल मिडीयावर चॅटींग केली. सदर चॅटींग एका विशिष्ट धर्माच्या सोशल मिडीया गृपवर प्रसारित केली व वैयक्तिक चॅटींग सार्वजनिक केली.
त्यासोबतच खोटी माहिती प्रसारित करून कट रचून एका विशिष्ट गटाच्या लोकांना एकत्र बोलाऊन दंगल घडवुन आणली, असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जुने शहरातील दंगली बाबत पोलिस स्टेशन जुने शहर येथे कलम १४३ ते १४९, ३०७, ४३५, ३५३, ३३३, ३३६, ३३७, ४२७ भादंवि सह कलम ७ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट सह कलम ३, ४. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायदा, कलम १४३, १४७, १४८, १४९, ४३५, ४३६, ४२७ भादंवि सह कलम ७ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट
सह कलम ३,४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायदा, कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, भादंवि, कलम १४३ ते १४९, ४३५, ४२७, २९५ भादंवि सह कलम ७ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट सह कलम ३,४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायदा अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात १०२ आरोपींना अटक केली असून त्यात सहा आरोपी अल्पवयीन (मुले) असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.