विरोधी पक्ष नेते पदासाठी भाजपने सुचविली ही नावे

नागपूर / विशेष प्रतिनिधी
नागपूर विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले आहे. विधान परिषद आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते रिक्त आहे. विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहाची विरोधी पक्षनेतेपदा रिक्त राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, भास्कर जाधव यांचा विधानसभा आणि सतेज पाटील यांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आग्रह महाविकास आघाडीकडून धरण्यात आला आहे. त्यासाठी पत्र देखील देण्यात आले आहे. मात्र, या दोघांच्या नावाला भाजपने विरोध केला आहे.
एका मराठी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपने विधानसभेत भास्कर जाधव यांच्या ऐवजी काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याची तयारी दाखवली आहे. तर, विधान परिषदेमध्ये सतेज पाटील यांच्या ऐवजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांना विरोधीपक्ष नेतेपद देण्याची तयारी दाखवली आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भास्कर जाधव यांच्या नावाला तीव्र विरोध आहे. जाधव हे आक्रमक नेते आहेत. त्यांची नियुक्ती झाली तर ते त्यांच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे हे असतील याची भीती शिवसेनेच्या नेत्यांना आहे. त्यामुळे भाजपकडे शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्य नावाला तीव्र विरोध करण्यात येत आहे.
विधासभा अध्यक्ष हे विरोधीपक्ष नेतेपदाची नियुक्ती करत असतात मात्र यामध्ये सत्ताधारी पक्षाचा मोठा वाटा असल्याचे दिसून येते. विरोधकांकडून पुरेसे संख्याबळ नसताना विरोधीपक्ष नेतेपद द्यायचे की नाही हे विधानसभा अध्यक्ष यांच्या मर्जीवर असते. मात्र, संख्याबळावर विरोधी पक्षनेतेपद नसते, असा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. यासाठी त्यांनी मृणाल गोरे, दि.बा. पाटील यांची उदाहरणे देत विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसताना देखील विरोधी पक्षनेतेपद दिले होते, असे म्हटले होते.
मविआमध्ये फूट पाडण्याचा डाव
काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात फूट पाडण्यासाठी भाजपकडून विजय वडेट्टीवार आणि अनिल परब यांची नावे सुचवण्यात आली आहेत. मात्र, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेना ही भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांच्या नावावर ठाम आहेत. विरोधकांमध्ये या मुद्यावर कुठल्याही प्रकारची फूट पडणार नाही. सर्व विरोधक एकत्र राहतील, असे मविआमधील नेते सांगत आहे.




