उपजिल्हा रूग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
भंडारा / नवप्रहार डेस्क
शासकीय रुग्णालयात निष्काळजी पणाच्या अनेक घटना उघड होत असतात. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात निष्काळजी पणाचा कळस गाठणारा प्रकार समोर आला आहे. येथे प्रसूती साठी आलेल्या महिलेचा रक्तस्त्राव रोखण्यासाठी तिच्या योनीमार्गात टाकलेला कापड काढण्याचे डॉक्टर विसरले. सदर कापड शरीरात कुजल्याने त्यामुळे उद्भवणाऱ्या दुर्गंधीने हा प्रकार उघड झाला. यानंतर खाजगी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून कापड काढले आणि महिलेला त्रासमुक्त केले.
डॉक्टरांचा महिलेच्या जीवाशी खेळ
महिला रुग्णाच्या प्रसूतीनंतर होणारा रक्तस्त्राव रोखण्यासाठी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी महिलेच्या योनी मार्गावर कापड लावला. मात्र, तो कापड काढायला डॉक्टर विसरल्यानं महिलेच्या शरीरातचं तो तब्बल 15 दिवस राहिल्यानं सडला. यामुळं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटल्यानं महिलेला दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया करून तो सडलेला कापड काढावा लागला. हा संतापजनक प्रकार भंडाऱ्याच्या तुमसर इथं घडला आहे. हा संपूर्ण प्रकार तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात घडला आहे.
नेमकं काय घडलं?
तुमसर तालुक्यातील तामसवाडी या गावातील पीडित महिलेची पहिली प्रसूती असल्यानं 24 एप्रिलला त्यांना तुमसरच्या सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 25 एप्रिलला झालेल्या नॉर्मल प्रसूतीदरम्यान, डॉक्टर आणि तिथे उपस्थित नर्सच्या पथकानं प्रसूतीनंतर महिलेला होत असलेला रक्तस्त्राव थांबविण्यासाठी तिच्या योनी मार्गावर कापड ठेवला. मात्र, तो कापड काढणे डॉक्टर आणि महिलेची प्रसूती करणारे पथक विसरले.
प्रसुतीनंतर योनी मार्गातील कापड काढण्यास डॉक्टर विसरले
दरम्यान, 27 एप्रिलला रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर महिला घरी गेल्यानंतर दोन दिवसानंतर तिला पोटदुखी आणि शरीरातून उग्र स्वरूपाची दुर्गंधी येत असल्याचं लक्षात आलं. याबाबत पतीनं पुढील उपचारासाठी पत्नीला तुमसर येथील खासगी रुग्णालयातील स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. शेखर चोपकर यांच्याकडे नेलं. यावेळी डॉक्टरांनी महिलेची तपासणी करून शस्त्रक्रिया करून तिच्या शरीरातून अगदी सडलेल्या अवस्थेतील कापड बाहेर काढला. तब्बल 15 दिवसानंतर महिलेच्या शरीरातून सडलेला कापड बाहेर काढला असला तरी, तिच्या शरीरात काही प्रमाणात बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलेलं होतं. उपचारानंतर आता महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं नवजात बाळाच्या मातेचा जीव धोक्यात आला होता. अशा डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी महिलेच्या पतीनं केली आहे.