रुममेट ने मैत्रिणीचे अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल
पोलिसात तक्रार ; मैत्रिणी सह सहा लोकांवर गुन्हा दाखल
पुणे / नवप्रहार न्यूज नेटवर्क
विध्येचे माहेरघर म्हणून नावलौकिक असलेले पुणे शहर मागील काही काळापासून भलत्याच प्रकरणात प्रसिद्धीस येत आहे. येथे क्राईम बऱ्याच प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. आता तर रुममेट ने कहरच केला आहे. तिने मैत्रिणीचे अर्धनग्न फोटो मित्रांना पाठवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. ही बाब पीडितेच्या मित्रांनी तिच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मैत्रीण आणि तिच्या सहा मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही मैत्रीण पीडितेवर तिच्या मित्रांसोबत मैत्री करण्यासाठी दबाब आणत होती. पीडितेने या साठी सपशेल नकार दर्शविल्याने हा प्रकार घडल्याचे समजत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कोथरुड परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीने आपल्यासोबत राहणाऱ्या एका 23 वर्षे तरुणीचे अर्ध नग्न फोटो काढले. इतकंच नव्हे तर तिने तिचे ते फोटो मित्रांनादेखील पाठवले. डिसेंबर 2022 ते जून 2023 या कालावधीत हा प्रकार घडला. मात्र, 23 वर्षीय पीडित तरुणीने या प्रकरणी आता तक्रार दाखल केली आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी आता पीडित तरुणीच्या मैत्रिणीसह सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी तरुणी पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. कोथरूड परिसरात दोघीही फ्लॅट रेंटवर घेऊन त्या एकत्र राहत होत्या. दरम्यान त्या राहत असलेल्या फ्लॅटवर आरोपी तरुणीचे मित्र अधून मधून येत असत. आरोपीने या मित्रांची ओळख फिर्यादी तरुणीसोबत ही करून दिली होती. तसेच त्यांच्यासोबत मैत्री करावी म्हणून ती फिर्यादी तरुणीच्या पाठीमागे तगादा लावत होती. मात्र फिर्यादी तरुणीने मैत्री करण्यास नकार दिला. यावरून त्या दोघीत सातत्याने वादही होत होते
दरम्यान, काही दिवसानंतर आरोपी तरुणीने 23 वर्षीय तरुणीच्या नकळत तिचे खासगी अर्धनग्न फोटो काढले आणि तिच्या मित्रांपैकी एकाला पाठवले. त्यानंतर तिने वेगवेगळी फेक इंस्टाग्राम अकाउंट्स काढले. या अकाउंटवरुन तिने फिर्यादी तरुणीचे अर्धनग्न फोटो वारंवार पोस्ट केले. हे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल केले गेले. पीडित तरुणीचे हे फोटो तिच्या कुटुंबीयांनी व मित्र परिवारांनी पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने हे फोटो आणि इन्स्टाग्राम अकाउंट तिच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
बदनामी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित तरुणीने कोथरुड पोलिस ठाण्यात धाव घेतली. कोथरुड पोलिसांनी आरोपी तरुणीसह तिच्या मित्रांवर आणि दोन फेक अकाउंट तयार करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच, कोथरुड पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.