बटण दाबली नगराची आणि लाईट लागला कमळी बाईचा

मतदार मतदान करण्यासाठी गेला असता त्याला त्याचे मतदान झाल्याचे सांगण्यात आले.
चंद्रपूर / विशेष प्रतिनिधी
गडचांदुर येथे मतदाना दरम्यान अजब घटना घडली आहे. मतदाराने नगारा चिन्हासमोरील बटण दाबले आणि लाईट मात्र कमळाचा लागल्याचा त्याचा आरोप आहे. यानंतर मतदान केंद्रावर बराच गोंधळ उडाला.
या प्रकारामुळे संतापलेल्या मतदाराने मतदान केंद्रातच ईव्हीएम मशीन जमिनीवर पटकून फोडून टाकल्याची घटना सायंकाळी ५.२० मिनिटांनी घडली.
या प्रकरामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला आहे. दरम्यान संतप्त मतदारांनी भाजपा निषेधाच्या घोषणा देत अशा पध्दतीने निवडणूका होत असतील तर काय फायदा, या देशात लोकशाही जिवंत आहे काय असा प्रश्न निवडणूक अधिकाऱ्यांना केला.
गडचांदूर येथे सकाळी सात वाजतापासून नगर पालिका निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली. तीन प्रभागातील मतदान केंद्रावर सकाळी शांततेत मतदान सुरू होते. मात्र त्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये अचानक बिघाड झाल्याने काही वेळासाठी मशीन बंद करण्यात आली. त्यामुळे मतदान केंद्रावर मतदारांची मोठी रांगच लागली. दरम्यान त्यानंतर पून्हा सुरळीत मतदान सुरू झाले.
मात्र सायंकाळी ५.२० वाजताच्या सुमारास आदर्श हिंदी विद्यालय बुथ क्रमांक २ येथे राम दुर्गे हा मतदार मतदान करण्यासाठी गेला. त्याने नगारा चिन्हा समोरचे बटण दाबले. मात्र भाजप उमेदवाराच्या नावासमोरील कमळ चिन्हाचा लाल लाईट लागला. या प्रकारामुळे मतदान दुर्गे चक्रावून गेला. त्याने या प्रकार मतदान केंद्र अधिकाऱ्याकडे केली.
दरम्यान त्याच वेळी या प्रकारामुळे संतापलेल्या दुर्गे याने ईव्हीएम मशीन हातात पकडली आणि जमिनीवर जोरदार पटकून मशीनच फोडून टाकली. या प्रकारामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला. यावेळी मतदान केंद्रावर तैनात पोलिसांनी सर्वप्रथम दुर्गे यांन ताब्यात घेतले. मात्र आपला काहीच गुन्हा नाही, ईव्हीएम मध्ये नगारा चिन्हाला मत दिल्यानंतर कमळाचा लाईट लागला. हा प्रकार योग्य नाही. येथे अशाच प्रकारे मतदान झाले आहे, त्यामुळेच अशा पध्दतीने संताप व्यक्त केल्याचे सांगितले.
हा सर्व प्रकार सुरू असतांना मतदान केंद्रावर मतदानासाठी एकत्र आलेल्या संतप्त मतदारांनी भाजप मुर्दाबाद अशा घोषणा देत भाजपाचा निषेध केला. तसेच हा प्रकार इतरही मतदान केंद्रावर झालेला आहे असेही सांगण्यात आले. या घटनेनंतर मतदान केंद्रावर मोठा हंगामा व गोंधळ सुरू झाला आहे. मतदान केंद्रावर लोकांनी गर्दी केली असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कॉग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांनी सर्वच मतदान केंद्रावर तपासणी करावी अशी मागणी केली आहे. ईव्हीएम मशीन फोडल्यानंतर ती मतदान केंद्रावर तशीच पडून होती. या घटनेमुळे मतदान केंद्रावरील अधिकारी घाबरले आहेत. याप्रकरणी कुणी काहीही बोलायला तयार नाहीत.
गडचांदुरात बोगस मतदान
गडचांदूर येथे एका बुथवर मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदाराचे आधीच मतदान झाल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला. त्यानंतर या मतदान केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. प्रभाग क्रमांक ४, अनुक्रमांक ७१, खोली क्रमांक ०३ या मतदान केंद्रावर एकूण ८९२ मतदार नोंदविलेले आहेत. याच केंद्रावर गडचांदूर येथील मतदार संतोष जगन्नाथ टोंगे यांचे मतदान आधीच झाल्याचे आधीच झाले होते. टोंगे मतदान केंद्रात पोहोचताच,आपले मतदान झाले आहे असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यानंतर नियमांनुसार त्यांच्याकडून छापीव्ह मतपत्रिकेद्वारे (टेंडर वोट) मतदान घेण्यात आले.
माझ्या मतदानाचा हक्क हिरावण्याचे काम निवडणूक विभागाने केले आहे. लोकशाही व्यवस्थेत अशी गळचेपी अत्यंत चिंताजनक आहे, असे टोंगे यांनी सांगितले. आम्ही त्यांचे बॅलेट पेपरवर मतदान करवून घेतले आहे. पुढील कारवाई निवडणूक आयोगाच्या स्तरावर करण्यात येईल, असे स्पष्टीकरण झोनल अधिकारी दिप्ती तेलंग यांनी सांगितले. यामुळे मतदान केंद्रावर तणावाची स्थिती निर्माण झाली होती.




