बिबट्याचा हॉटेल मधील कर्मचाऱ्याच्या खोलीत मुक्काम
जयपूर ( राजस्थान ) / नवप्रहार वृत्तसेवा
कमी होणारा जंगल परिसर आणि त्यामुळे उत्पन्न होणारी भक्ष्याची समस्या यामुळे जंगली प्राणी गाव आणि शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे अनेक वेळा बिबट्या सारखा प्राणी गावात आणि शहरात आढळत आहे. कधी तो गाईच्या गोठ्यात शिरून गाईची तर कधी कुत्र्यांची शिकार करीत असल्याचा घटना घडतात. अशीच घटना राजस्थान च्या जयपूर येथील एका हॉटेल परिसरात घडली.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘कानोटा कॅसल हेरिटेज हॉटेल’मधील एका कर्मचाऱ्याच्या खोलीत दिवसाढवळ्या बिबट्या घुसलेला होता. त्या खोलीत राहणारा कर्मचारी त्याच्या मुलाला शाळेमध्ये सोडण्यासाठी गेला असताना, तो बिबट्या खोलीत घुसला असल्याचा अंदाज आहे. कर्मचाऱ्याला खोलीमध्ये जंगली प्राणी असल्याचे लक्षात येताच, त्याने खोलीचे दार बाहेरून बंद करून घेतले.
‘सकाळच्या वेळी हॉटेलमधील कुत्र्यांनी अचानक भुंकणे सुरु केले, तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला; तरीही ते शांत झाले नाहीत. त्यानंतर त्या हॉटेलमध्ये असणाऱ्या पर्यटकांनी हॉटेलच्या मॅनेजरला त्यांना या आवारात बिबट्या दिसल्याचे सांगितले; तेव्हा त्यांनी ताबडतोब वन विभागाला कळवले. काही वेळाने वन विभागाचे कर्मचारी तिथे येऊन, त्या बिबट्याला घेऊन गेले.’ अशी माहिती वन विभागाच्या टीमने द टाइम्स ऑफ इंडियाला दिली.
हा व्हिडीओ, हॉटेलमधील खोलीच्या खिडकीतून शूट केलेला आहे. त्यामध्ये बिबट्याने संपूर्ण खोलीतील सामान अस्ताव्यस्त केलेले आपण पाहू शकतो. खिडकीमधून व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला बघताच अत्यंत चपळाईने, गुरगुर करत तो खिडकीजवळ आल्याचेदेखील पाहायला मिळते. त्याचबरोबर, बिबट्याला वन विभागाने शांत करण्यासाठी मारलेला बाण देखील त्या जंगली जनावराच्या पायाशी पाहू शकतो.
@ikaveri या एक्स [पूर्वीचे ट्विटर] अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर होताच तो प्रचंड व्हायरल झाला आहे.
‘सकाळी आम्हाला, एका हॉटेलच्या परिसरात बिबट्या फिरताना दिसला आहे, अशी माहिती देणारा फोन आला. त्यानंतर वन विभागाची एक टीम आणि जयपूर प्राणीसंग्रहालयाची एक टीम त्या हॉटेलमध्ये पोहोचली. त्या बिबट्याला सुरक्षितरित्या नाहरगड बचाव केंद्रामध्ये नेण्यात आले आहे. त्या बिबटयावर थोडेसे औषधोपचार करून पुन्हा जंगलात सोडून दिले जाईल. दरम्यान कोणालाही कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही.’ अशी माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्याने दिल्याचे न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते. एक्स या सोशल मीडियावर शेअर झालेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत, १९.७ K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.