चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या भाविकांचा आकडा 116
आयोजकांवर गुन्हा दाखल ; भोले बाबा फरार
हाथरस / नवप्रहार डेस्क
सत्संग मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 116 भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. तर या घटनेनंतर भोले बाबा फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. भोले बाबा उर्फ नारायण हरी याचा फोन बंद येत आहे. बाबा हाथरस च्या बाहेर गेल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 24 तासांमध्ये तपासाचा रिपोर्ट द्यायचे आदेश दिले आहेत. तसंच हा अपघात आहे का घातपात, याचा तपासही पोलीस करतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. चेंगराचेंगरीची ही दुर्घटना पुलराई गावातल्या सत्संगावेळी झाली. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक भाविक आले होते.
हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी आशिष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंकदराराऊमध्ये भोले बाबांचा सत्संग होता. सत्संगावेळी हवेची आर्द्रता खूप जास्त होती, सत्संग संपल्यानंतर भाविक बाहेर पडत होते, त्यावेळी चेंगराचेंगरी झाली. या सत्संगाला एसडीएमनी परवानगी दिली होती. सत्संगासाठी तब्बल 50 हजार भाविक आले होते. 50 हजारांच्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी 72 पोलीस ड्युटीवर होते.
चेंगराचेंगरीचं कारण समोर
हाथरसमध्ये झालेल्या या चेंगराचेंगरीचं कारणही समोर आलं आहे. भोले बाबाची गाडी जात असल्यामुळे गर्दीला थांबवण्यात आलं होतं. भोले बाबाचा ताफा गेल्यानंतर गर्दीला सोडण्यात आलं, मागून आलेल्या गर्दीने पुढच्या लोकांना तुडवलं, त्यामुळे लोक धावायला लागले. या चेंगराचेंगरीत 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.
कॉन्स्टेबल चा बाबा झाला
या भोले बाबाचं खरं नाव सुरज पाल सिंह आहे. भोले बाबा आधी पोलीस कॉन्स्टेबल होता. 1990 च्या आसपास त्याने नोकरी सोडली. पटियाली तहसीलच्या बहादुर नगर गावात बाबाचा जन्म झाला होता. भोले बाबा त्याच्या पत्नीसोबत राहतो, त्याला मुलबाळ नाही. गावामध्ये दीड वर्षांपूर्वी आल्यानंतर बाबाने ट्रस्ट बनवली. राजस्थानमध्येही बाबाच्या आश्रमाचा प्रभाव आहे. भोले बाबाला तीन भाऊ आहेत. आग्रा, अलिगड आणि राजस्थानमध्ये भोले बाबा राहायचा.