कथित प्रियकराची समजूत काढायला जाणे जीवावर बेतले

कथित प्रियकराची समजूत काढायला जाणे जीवावर बेतले
प्रियकराने दरीत ढकलून घेतला जीव ?
कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी
मागील साडेपाच वर्षांपासून प्रेमात असलेल्या कथित तरुणाची समजूत काढायला जाणे तरुणीच्या जीवावर बेतले आहे. प्रियकराच्या भेटीला गेलेल्या तरुणाने तिची दरीत ढकलून हत्या केल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. कथित प्रियकराने तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. तर हा हत्येचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आहे.
तरन्नुम बशीर नाईक असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव असून श्रीपाद दिनकर वडर असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. तरन्नुमचं १२ ऑक्टोबरला लग्न होणार होतं. मात्र, लग्नाच्या अवघ्या तीन दिवस आधीच तिचा मृत्यू झाला. आरोपीने तरुणी बेपत्ता झाल्याचा बनाव केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकर न्याय द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरन्नूम आणि श्रीपाद हे दोघंही गारगोटी गावात वास्तव्याला होते. दोघांची घरं एकमेकांच्या घरासमोर होती. यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांचं साडेपाच वर्षांपासून अफेअर असल्याची माहिती आहे. मात्र काही दिवसांपूर्वी तरन्नूमचं दुसऱ्या एका मुलासोबत लग्न ठरलं होतं. त्यामुळे ती श्रीपादला भेटत नव्हती. घटनेच्या दिवशी देखील ती श्रीपादला समजावून सांगायला गेली होती. प्रियकराला समजावून सांगायला जाणं, तिच्या जीवावर बेतलं आहे. आरोपीनं तिची दरीत ढकलून हत्या केल्याचा आरोप आहे.
भुदरगड तालुक्यातील शिवडाव-नाईकवाडी परिसरात ही घटना घडली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरन्नुम बशीर नाईक हिचे १२ ऑक्टोबरला लग्न होणार होते. मात्र, त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणात तरन्नुमचा प्रियकर श्रीपाद दिनकर वडर याच्यावर तिला दरीत ढकलून हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपीला अटक केली आहे.
कॉलेजला जात असल्याचं सांगून तरन्नुम घराबाहेर पडली होती. दुपारी जेव्हा कॉल केला, तेव्हा आपण कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये आहोत, असं तिने फोनवर सांगितलं होतं. मात्र, तिची दिशाभूल करून तिला फिरायला नेण्यात आलं, अशी माहिती तरन्नूमच्या आईनं दिली. तर आरोपीने तरन्नूमची हत्या करून आपण पाणी आणण्यासाठी गेलो असताना ती दिसेनाशी झाल्याचा बनाव केल्याचा आरोप तरुणीचे नातेवाईक साजिद गडकरी यांनी केला आहे.