जागतिक

जग महाभयंकर परिस्थितीच्या उंबरठ्यावर 

Spread the love

डोनाल्ड ट्रम्प आपल्याच चक्रव्युहात फसले की काय ?

वॉशिंग्टन / नवप्रहार डेस्क 

इस्त्रायल – इराण – अमेरिका यांच्या युद्धाला तीन आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. इराण ने होर्मुझ सामुद्रधुनी चा मार्ग रोखल्याने जगात कच्चा तेल आणि गॅस चे संकट निर्माण झाले आहे. या युद्धात पाकिस्तान ने मध्यस्थी करत अमेरिकेचा पंधरा कलमी शांतता प्रस्ताव फेटाळून लावत आपला पाच कलमी प्रस्ताव अमेरिका समोर ठेवला आहे.

भरवसा, लहर, विक्षिप्तपणा अशा अस्थिर मानसिकतेच्या विशेषणांचे धनी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमार्फत पाठविलेला पंधरा कलमी शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला आणि स्वतःचा पाच कलमी प्रस्ताव अमेरिकेसमोर ठेवला.

या दोन्ही प्रस्तावांचे वैशिष्ट्य हे की, अणू कार्यक्रम थांबवा, समृद्ध युरेनियमचा साठा आंतरराष्ट्रीय निगराणीत ठेवा वगैरे अमेरिकेचे मुद्दे इराणला मान्य होणारे नाहीत आणि मध्यपूर्वेतील तळ बंद करा, भविष्यात हल्ल्याची आगळीक करणार नसल्याचा शब्द द्या किंवा सुएझ कालव्याप्रमाणे होर्मुझ सामुद्रधुनीत टोलवसुलीची परवानगी द्या वगैरे इराणचे मुद्दे अमेरिका कबूल करणार नाही.

अमेरिकेसोबत युद्धाची रणभेरी वाजविणाऱ्या इस्रायलला तर मुळात ही शांततेची बोलणीच मान्य नाहीत. परिणामी, गेल्यावर्षी गाझापट्टी किंवा इराणवरील हल्ले थांबविण्याचा ट्रम्प यांचा आदेश जसा धुडकावला होता तशा तयारीत पुन्हा इस्रायल दिसते. जगावरील इंधन संकट, शेअर बाजारातील पडझड किंवा एकूणच आर्थिक संकटाची जितकी चिंता अमेरिकेला, डोनाल्ड ट्रम्प यांना आहे, तितकी ती इस्रायलला नाही. किंबहुना त्या संकटाचा विचारच इस्रायल करीत नाही. हे युद्ध फसले आणि इराणमधील राजवट बदलण्यात, आण्विक कार्यक्रम व बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात अपयश आले की, इराण वरचढ होईल.

मध्यपूर्वेतील कट्टरपंथी, दहशतवादी संघटना डोके वर काढतील, सगळे मिळून आपल्याला नकाशावरून मिटवायचे प्रयत्न करतील, अशी भीती इस्रायलला आहे. त्यामुळे ‘आम्हीच जिंकलो, आम्हीच जिंकलो’ म्हणत अमेरिकेने माघार घेतली तरी इस्रायल हल्ले थांबविणार नाही. ट्रम्प यांच्या पाच दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा धाब्यावर बसवून इस्रायलचे इराणवर हल्ले सुरूच आहेत. अशाच हल्ल्यात गुरुवारी होर्मुझ सामुद्रधुनीत जगाची कोंडी करणारे नाविक दलाचे कमांडर अलिरेजा तांगसिरी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. या पार्श्वभूमीवर, पाच दिवसांचा युद्धविराम शनिवारी संपुष्टात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काय करतात, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

युद्धबंदी व शांततेच्या मार्गातील पंधरा व पाच कलमी प्रस्तावांची वासलात अगदी प्रारंभीच लागल्याचे दिसते. त्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानची विश्वासार्हता हीदेखील अडचण आहे. कारण, औपचारिकता म्हणून इराणचे काही नेते, विशेषतः ट्रम्प यांचा माणूस म्हणून ओळख असलेले इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद घालीबाफ पाक नेत्यांची चर्चा करीत असले तरी मुळात पाकिस्तानच अमेरिकेच्या हातचे बाहुले असल्याने जग मात्र पाकिस्तानच्या मध्यस्थीबद्दल गंभीर नाही. इराणच्या कडव्या प्रतिकाराने अमेरिका अडचणीत आली आहे. इस्रायल व अमेरिकेचे युद्धासंबंधीचे आडाखे इराणने हाणून पाडले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व इस्रायलला तितकेसे नसले तरी अमेरिकेची कोंडी त्यामुळेच झाली आहे.

जगाच्या एकूण इंधनापैकी वीस टक्के, खतांची ३३ ते ३८ टक्के आणि हेलियमची एकतृतीयांश वाहतूक रोखून या सामुद्रधुनीत जगाची आर्थिक नाकेबंदी केली जाईल, याची कल्पना अमेरिकेने केली नव्हती. परिणामी, इराक किंवा अफगाणिस्तानप्रमाणे आणखी एका प्रदीर्घ युद्धाच्या कात्रीत अमेरिका सापडली आहे. त्यात अडकलेले डोनाल्ड ट्रम्प बाहेर पडण्यासाठी एकीकडे शांतिदूताचा आव आणीत एकतर्फी युद्धविराम जाहीर करीत आहेत आणि दुसरीकडे मात्र मोठ्या युद्धाची तयारी करीत आहेत.

विशेषतः थेट मैदानात सैन्य उतरविण्याची तयारी सुरू आहे. अत्यंत निष्णात कमांडोंची तुकडी अशी ओळख असलेली ८२वी एअरबोर्न डिव्हिजन इराणमध्ये उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत. मैदानी युद्ध लढायचे असेल तर इराणचे कोण कोण शेजारी मदत करतील, याचीही कदाचित चाचपणी सुरू असेल. आधीच इराणच्या हल्ल्यांनी घायाळ झालेले आखाती देश त्यासाठी किती उत्साह दाखवतील, हा प्रश्न आहे; परंतु त्यादृष्टीनेच पाकिस्तानचे लाड सुरू असावेत; पण युद्धाने असे विनाशकारी वळण घेतले तर ते केवळ आखाती देशांपुढेच नव्हे, तर अख्ख्या जगावर महाभयंकर संकट असेल.

कारण, युद्ध केवळ मैदानात लढले जाणार नाही. दोन्हींकडून अण्वस्त्रांचा वापर होण्याची भीती आहे. तसे झाले तर जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले जाईल. दुसऱ्या महायुद्धाचा शेवट जपानच्या हिरोशिमा व नागासाकी शहरांवर अमेरिकेने टाकलेले अणुबॉम्ब आणि अपरिमित जीवितहानीनंतर झाला होता. तेव्हाच्या जखमा ऐंशी वर्षांनंतरही पुरत्या भरलेल्या नाहीत आणि जग पुन्हा एकदा तशाच महाभयंकर संकटाच्या तोंडावर उभे आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close