अजित पवारांनी अफवांना दिला पूर्णविराम

बारामती (पुणे) / नवप्रहार डेस्क
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवा नंतर अजित पवार बारामती सोडून शिरूर मधून निवडणूक लढवतील अश्या अफवांना पेव फुटले होते. पण काल येथे झालेल्या सभेदरम्यान अजित पवार यांनी या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती मतदारसंघातून न लढता शिरूरमधून विधानसभा लढतील, अशा चर्चा गेल्या दोन तीन दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होत्या. लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना मताधिक्य न दिल्याने नाराज होऊन अजित पवार हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर मतदारसंघातून लढतील, असे बोलले गेले.
मात्र सोमवारी रात्री बारामतीत झालेल्या एका कार्यक्रमात बारामतीमधूनच लढणार असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले.
अजित पवार यांनी व्यापारी मेळाव्याला संबोधित केले
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी बारामती दौऱ्यावर होते. व्यापारी मेळाव्याच्या कार्यक्रमात बारामतीमधील विकासकामांची जंत्री अजित पवार यांनी मांडली. तुमच्याकडे आलेल्या ग्राहकाला मी केलेली बारामतीमधील विकासकामे सांगितली तरी माझे काम सोपे होईल, असे अजित पवार म्हणाले. यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी दुसरीकडून कुठूनही न लढता बारामतीमधूनच मी लढेन, असे अप्रत्यक्ष सांगितले. तसेच शिरूरमधून लढणार असल्याचे खंडनही केले.
अजित पवार यांनी हसत हसत उमेदवाराचे अप्रत्यक्ष नाव सांगितले
आजपर्यंत बारामतीसाठी मी हजारो कोटींची कामे केली. त्यामुळे घडाळ्यासमोरचे बटन दाबून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करा. तुमच्या मनातला उमेदवार घड्याळ घेऊन बारामतीत उभा राहील, असे अजित पवार म्हणाले. उपस्थितांनी उमेदवाराचे नाव घोषित करा, असा आग्रह केल्यानंतर लोकांच्या मनात कोण आहे, याबद्दल मला सर्व्हे करावा लागेल, असे हसत हसत अजित पवार म्हणाले. गहाळ राहू नका, जो मोठ्याने माझ्या नावाची घोषणा देतो, त्याचाच बूथ मागे राहतो, असे माझे निरीक्षण आहे, असे चिमटेही त्यांनी कार्यकर्त्यांना काढले.
बारामतीमधून जय पवार यांच्या लढण्याच्या चर्चा सुरू होत्या
अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारीसंदर्भात पक्षाची कोअर कमिटी निर्णय घेईल, असे अजित पवार यांनी याआधीच सांगितले आहे. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार उमेदवार असणार आहेत. किंबहुना युगेंद्र पवार यांनी तशी तयारीही सुरू केली आहे. बारामतीची लढाई भावाभावात होईल, अशीही चर्चा बारामतीत आहे. त्यामुळे अजित पवार बारामतीमधून लढले नाही तर कुठून लढणार, याविषयी पक्षात विविध चर्चा सुरू होत्या.