किडनी रॅकेट मधील एजंट सुंचू याच्याकडे अब्जावधींची प्रॉपर्टी

सोलापूर / विशेष प्रतिनिधी
देशात चर्चेचा विषय ठरत असलेल्या हाय प्रोफाइल किडनी रॅकेट मधील एजंट रामकृष्ण सुंचु याच्याकडे अब्जावधींची प्रॉपर्टी असल्याचे समजत आहे. नुकतीच त्याने शहराच्या मोक्याच्या ठिकाणी २५ एकर जागा खरेदी केल्याचे त्याच्या जवळच्या व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांच्या किडनी विक्री प्रकरणात सुंचू सध्या अटकेत आहे. धार्मिक कार्यक्रम, रोख देणग्या, व्हीआयपी जीवनशैली आणि संशयास्पद कागदपत्रांमुळे सोलापुरात सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे. हैदराबाद येथे नोकरी- व्यवसायानिमित्त गेलेला सुंचू दहा वर्षांपूर्वी सोलापुरात आला. सुंचू आणि त्याच्या नातेवाइकांच्या नावे तो राहात असलेल्या प्रियदर्शनी नगरातील बंगल्यासह १५ ते २० प्लॉट/घरे (अंदाजे दोन कोटी रुपये), तसेच अय्यप्पा स्वामी मंदिराजवळ तीन एकर जागा (अंदाजे तीन कोटी रुपये) आहे. याशिवाय, जुने विडी घरकुल परिसरातील जय संतोषी माता गोशाळा ते आसाराम बापू मठ परिसरात त्याने २० एकर जमीन खरेदी केल्याची माहिती नव्याने पुढे आली आहे. या जमिनीची अंदाजे किंमत १५ कोटी रुपये आहे. जुने विडी घरकुल येथील एका प्रसिद्ध मंदिराचे अध्यक्ष असलेल्या इस्टेट एजंटामार्फत ही जमीन खरेदी करण्यात आल्याची माहिती मिळाली.
प्रवचनाला ट्रस्टचे नाव देण्याची अट
पुढील वर्षी सोलापुरात होणाऱ्या चागंटी कोटेश्वरराव महाराज यांच्या प्रवचनाचा सर्व खर्च उचलण्याची तयारी सुंचूने दर्शवली होती. मात्र, या प्रवचनाला ‘वैष्णवी देवी मंदिर ट्रस्ट’ हे नाव देण्याची अट त्याने घातल्याने, हे प्रवचन पारंपरिक आयोजकांमार्फतच होणार असल्याची माहिती मिळाली.
प्रवचनासाठी २० लाखांचा ॲडव्हान्स
२०१७ मध्ये रामकृष्णने देवकीनंदन ठाकूर यांचे प्रवचन सोलापुरात आयोजित केले होते. त्यासाठी ७५ लाख रुपये खर्च आला. मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण सुंचू याने नोव्हेंबर २०२६ मध्ये प्रसिद्ध देवकीनंदन ठाकूर यांच्या प्रवचनाचे पुन्हा आयोजन केले आहे. त्यासाठी २० लाख रुपये देऊन प्रवचन बुक केल्याचे सांगण्यात आले.
रोख देणग्यांचा पाऊस
जुने विडी घरकुल येथील वैष्णवी देवी मंदिराचे बांधकाम, तमिळनाडूतील महाबलिपुरम येथून मूर्ती, पितळी धातूचे ध्वजस्तंभ, मूर्ती प्रतिष्ठापना व मिरवणूक हा सर्व जवळपास एक कोटीचा खर्च रामकृष्णनेच केल्याचे समजते. या प्रत्येक कामासाठी त्याने रोख पैसा खर्च केला आहे. तसेच, अशोक चौक येथील साईबाबा मंदिर परिसरातील यल्लमा देवी मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठा, मिरवणूक आणि ५०० साड्यांच्या वाटपासाठी त्याने रोख सुमारे पाच लाख रुपये खर्च केल्याची माहिती आहे.




