जेवणानंतर काही मिनिटा नंतर तिला अस्वस्थ वाटू लागले आणि झाला मृत्यू

नागपूर/ विशेष प्रतिनिधी
जेवणात एका १७ वर्षीय तरुणीने भात बनवला. पण जेवणाच्या काही वेळानंतरच तिला अस्वस्थ वाटू लागले. आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. भात खाणे तरुणीच्या जीवावर बेतले आहे. बहादुरा रोड परिसरात ही घटना घडली आहे.
भात बनवत असताना झालेली एक छोटीशी चूक तिच्या जीवावर बेतली आहे. ही घटना उघडकीस येताच नागपूरसह आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
माही किशोर उमाळे असं मृत पावलेल्या १७ वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती नागपुरच्या बहादुरा रोड परिसरातील मानवशक्ती सोसायटीत आपल्या कुटुंबासमवेत राहते. घटनेच्या दिवशी २० डिसेंबर रोजी तिने आपल्या घरात जेवण बनवलं होतं. यावेळी तिने भातही केला होता. पण वरून पांढराशुभ्र दिसणारा भात तरुणीच्या जिवावर बेतला आहे.नागपुरच्या तरुणीसोबत काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील बहादुरा रोड येथील मानवशक्ती सोसायटीत राहणाऱ्याने माहीने २० डिसेंबर रोजी सायंकाळी घरातील जेवण बनवण्याची तयारी सुरू केली होती. घरातील स्टीलच्या डब्यात तांदूळ ठेवलेले होते. घाईघाईत किंवा अनावधानाने माहीने तांदूळ न निवडता थेट शिजवण्यासाठी घेतले.
पण ज्या डब्यात हे तांदूळ ठेवलं होतं, त्या डब्यात घरच्यांनी तांदळाला कीड लागू नये म्हणून ‘कीड प्रतिबंधक गोळी’ टाकली होती. अशात माहीने तांदूळ न निवडता भात बनवला. पण या तांदळासोबत डब्यातील विषारी गोळी देखील शिजली गेली. यानंतर माहीने तो विषयुक्त भात खाल्ल्यानंतर काही वेळातच तिची प्रकृती खालावली.उपचारादरम्यान मृत्यू
भातातून विषारी गोळी पोटात गेल्याचे लक्षात येताच तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र शरीरात विष पसरल्यामुळे माहीची प्रकृती अधिकच खालावत गेली. अखेर मृत्यूशी झुंज देताना तिची प्राणज्योत मालवली. अवघ्या १७ वर्षांच्या तरुण मुलीचा अशा किरकोळ चुकीमुळे मृत्यू झाल्याने उमाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




