शालेय क्रिडा स्पर्धेत शिक्षकांनी सहभागी व्हावे – जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे
भंडारा नवप्रहार प्रतिनिधी/ हंसराज
भंडारा: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि तालुका क्रीडा समिती भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरिय बैठक जे.एम. पटेल महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जे.एम. पटेल महाविद्यालयातील शारीरिक व क्रीडा शिक्षक डॉ. भिमराव पवार, कुस्ती स्पोर्ट्स ॲकेडमीचे प्रशिक्षक विलास केजरकर, क्रीडा अधिकारी निखिलेश तभाणे, विकास गायकवाड, क्रीडा मार्गदर्शक मंगेश गुळघे, तालुका क्रीडा समिती संयोजक बेनिलाल चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शालेय क्रिडा स्पर्धेत क्रीडा शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे यांनी केले. त्यांनी मागील स्पर्धेचा आढावा घेतला आणि आगामी स्पर्धेत काय सुधारणा कराव्यात याबाबत चर्चा केली. क्रीडा शिक्षकांनी क्रीडा विभागाकडून आवश्यक सहकार्य मिळत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि क्रिडागंणातील अपुऱ्या सोईसुविधांचा मुद्दा उपस्थित केला. लेकुरवाळे यांनी या त्रुटी दूर करण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
शालेय क्रिडा सत्र २ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत सकाळी ९.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल, भंडाराच्या पटांगणावर आयोजित केले जाईल. जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांमधील १४, १७ व १९ वर्षीय विद्यार्थी-विद्यार्थ्यींनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन क्रीडा अधिकारी विकास गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका क्रीडा समिती संयोजक बेनिलाल चौधरी यांनी केले, तर प्रास्ताविक मंगेश गुळघे यांनी केले. उपस्थितांचे आभार सुनिल खिलोटे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय बिरणवार, शाम देशमुख, अरूण बांडेबुचे, सुनिल पंचबुध्दे, अंकित भगत, विलास पराते, विवेक चटप, सुयोग जांभुळकर, राहुल पाठक, राजेश गेडाम, ठाणेश्वर भोयर आदी क्रीडा शिक्षक-शिक्षिकांनी सहकार्य केले.